'तिच्या' दीर्घायुष्यासाठी 'त्याची' वटपौर्णिमा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जून 2016

पुणे - आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहावयास मिळते; पण हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून "तो‘ वडाची पूजा करतोय. असा सत्यवान दुर्मिळच; पण असा एक सत्यवान गेल्या पाच वर्षांपासून वडाची पूजा करीत आहे. अतुल सातपुते असे त्याचे नाव. 

पुणे - आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहावयास मिळते; पण हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून "तो‘ वडाची पूजा करतोय. असा सत्यवान दुर्मिळच; पण असा एक सत्यवान गेल्या पाच वर्षांपासून वडाची पूजा करीत आहे. अतुल सातपुते असे त्याचे नाव. 

व्यवसायाने अभियंता असलेला अतुल दीप्तीसाठी वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतो. अतुल व दीप्ती हे दोघे मूळचे कोल्हापूरचे. दोघांच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध. अभियांत्रिकीचे अध्ययन करण्यासाठी अतुल आणि कलाशाखेची पदवी घेण्यासाठी दीप्ती सांगलीला राहायला होते. महाविद्यालयीन जीवनात दोघांची घट्ट मैत्री जमली. एकमेकांची मने जुळली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेत दोघेही विवाहबद्ध झाले. दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या लग्नास सहमती दिली. 

कालांतराने दोघेही नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. वैवाहिक जीवनातले निर्णय दीप्ती व अतुल दोघे मिळून घेतात. एकमेकांच्या साथीने दोघेही "जीवनाच्या सप्तपदी‘ वरून चालत आहेत. लग्न झाल्यापासून प्रत्येक वटपौर्णिमेला दीप्तीसोबत अतुलसुद्धा वटसावित्रीची पूजा करतो. या दिवशी पारंपरिक वेशभूषा परिधान करून "जन्मोजन्मी हीच पत्नी‘ मिळावी, अशी प्रार्थना करतो. प्रत्येक निर्णय जेव्हा अर्धांगिनीसोबत घ्यायचा असेल तर वटसावित्रीचे पूजन दोघांनी करायला काय हरकत आहे, अशी या दाम्पत्याची भावना आहे. 

याबाबत अतुल म्हणाले, ‘दीप्तीने मला पावलोपावली साथ दिली. दीप्तीसोबत वटसावित्रीचे पूजन करण्याचा माझा निर्णय कुटुंबीयांनाही आवडला. मित्रांनी तर खूप कौतुक केले. पहिल्यावेळेस मी पूजन केले, तेव्हा थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. माझी भूमिका जेव्हा इतर महिलांना मी व दीप्तीने सांगितली, तेव्हा त्यांनीही कौतुक केले.‘‘ 

दीप्ती म्हणाल्या, ‘आम्ही दोघेही उच्चशिक्षित आहोत. सहजीवनात प्रत्येक पावलावर आम्ही एकमेकांना समान वागणूक देतो. म्हणून आम्ही एक आहोत. हीच आमची भावना आहे.‘‘

Web Title: vatpournima