रस्त्यावर वाहने अडवून भाजीविक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

हडपसर - पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडईबाहेरील अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या मंडईतील विक्रेत्यांनी आज सकाळी सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून भाजीविक्री सुरू केली. मोठ्या संख्येने विक्रेते वाहने अडवून मालाची विक्री करू लागले, त्यामुळे सकाळी आठ ते दहा या कालावधीत वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विक्रेत्यांनी माघार घेतली व रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. 

त्यानंतर विक्रेत्यांनी आपला मोर्चा सहायक महापालिका आयुक्त कार्यालयाकडे वळविला. मंडईबाहेर बसणाऱ्या अनधिकृत व्यावसायिकांमुळे मंडईत ग्राहक येत नाहीत, त्यामुळे आमची उपासमार होते. आम्ही अनेकदा तक्रारी करूनही मंडई प्रशासन कारवाई करत नाही. जोपर्यंत बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर भाजी विकणार व जागा भाडे देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर सहायक आयुक्त सुनील गायकवाड यांनी प्रशासनाकडून कारवाई होत असते. मात्र, यापुढे रोज सकाळी व संध्याकाळी अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर विक्रेते शांत झाले. पोलिस निरीक्षक विष्णू पवार म्हणाले, ‘‘मंडई व मंडईबाहेरील विक्रेत्यांचे प्रश्न सनदशीर मार्गाने व चर्चेने सुटू शकतात. रस्त्यावर येऊन कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.’’

पथारीवाल्यांचे पुनर्वसन पुलाखाली करण्याबाबतच्या प्रस्तावास वाहतूक विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू असून, पथारीवाल्यांचे पुनर्वसन लवकरच करण्यात येईल. यापुढे मंडईबाहेर भाजीपाला, फळविक्रेते यांचे अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 
- सुनील गायकवाड, सहायक आयुक्त

Web Title: vegetable sailing on road