#TuesdayMotivation : भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला ‘सीए’

शिरूर - ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झालेला रवींद्र ढवळे आई-वडिलांसमवेत.
शिरूर - ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झालेला रवींद्र ढवळे आई-वडिलांसमवेत.

शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे. 

शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात.

शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते. 

रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने २०१० मध्ये ‘सीए’ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो ‘फायनली पासआउट’ झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ॲण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com