भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला "सीए'

नितीन बारवकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.

 

शिरूर (पुणे) : भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या 15 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते.

रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने 2010 मध्ये "सीए'ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो "फायनली पासआउट' झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ऍण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

बारा रिझल्ट फेल, पाच रिझल्ट पास
कौटुंबिक स्थिती हलाखीची, प्रतिकूल परिस्थिती, अभ्यास करताना भाजीपाल्याच्या व्यवसायात करावी लागणारी मदत आणि सततचे अपयश अशा अवस्थेत रवींद्र ढवळे याने हार मानली नाही. आई-वडील व भावाच्या प्रेरणेमुळे तो पुढे प्रयत्न करीत राहिला आणि अखेर ध्येयाला गवसणी घातली. "सीए'सह एकूण 17 परीक्षा दिलेल्या रवींद्रकडे तब्बल 12 रिझल्ट फेल झालेले असून, पाच रिझल्ट पास झालेले आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable Vendors Son Became CA