कांदा, बटाटा, मटारच्या भावात घसरण;काही पालेभाज्या महागल्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

भेंडी, काकडी, शेवगा आणि टोमॅटोच्या भावात सुमारे १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. कांदा आणि बटाट्याचे भावही सामान्यांच्या आवाक्‍यात आले असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे - फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून भेंडी, काकडी, शेवगा आणि टोमॅटो वगळता सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भेंडी, काकडी, शेवगा आणि टोमॅटोच्या भावात सुमारे १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. कांदा आणि बटाट्याचे भावही सामान्यांच्या आवाक्‍यात आले असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

रविवारी येथील तरकारी बाजारात ८० ते ९० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटारची ३० ते ३५ ट्रक, तर मध्य प्रदेश आणि गुजरात येथून १० ते १२ ट्रक लसणाची आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १५०० ते १६०० पोती, कोबी सुमारे ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो सात ते साडेसात हजार पेटी, भुईमूग शेंगा सुमारे ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना ३० ट्रक, तर नवीन ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदोर, गुजराथ आणि स्थानिक मिळून बटाट्याची ४५ गाड्या आवक झाली.

बटाट्याचे भाव निम्याने घसरले;उत्पादक शेतकरी चिंतेत

काही पालेभाज्या महागल्या
मागणी वाढल्यामुळे पालक, कोथिंबीर, चुका आणि मुळ्याच्या भावात वाढ झाली आहे. पालकाच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे ७ रुपये, कोथिंबीर आणि चुकाच्या भावात प्रत्येकी ३ रुपये, मुळ्याच्या भावात २ रुपये वाढ झाली आहे. तर, आवकच्या तुलनेत मागणी घटल्यामुळे कांदापात आणि मेथीच्या भावात जुडीमागे अनुक्रमे ७ आणि ४ रुपये घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

येथील बाजारात रविवारी दीड लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दोन लाख जुडी होती. घटलेली आवक आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांच्या बेतामुळे घरगुती आणि हॉटेल व्यावसायिकांकडून कोथिंबिरीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव वाढले आहेत. तर, दुसरीकडे आवक वाढल्याने मेथीचे भाव घटले आहेत. गेल्या आठवड्यात मेथीची ५० ते ६० हजार जुडी आवक झाली होती. जी आज ७० हजार झाली.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-८००, मेथी : १००-३००, शेपू : २००-४००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-५००, चुका : ७००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१२००, हरभरा गड्डी : ४००-७०० रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables more expensive Falling rates of onions, potatoes, peas