गवार, शेवग्याने ओलांडली शंभरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पालेभाज्या, फळभाज्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे भाव तेजीत आहेत. जोपर्यंत बाजारात आवक वाढणार नाही तोपर्यंत भाज्यांचे भाव तेजीत राहतील.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, मार्केट यार्ड अडते असोसिएशन

मार्केट यार्ड - पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात त्यांची आवक घटली आहे. याचा फटका विक्रेत्यासह ग्राहकांनाही बसत आहे. गृहिणींचे बजेटही कोसळले आहे.

बाजारात काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच येणारा भाजीपाला दर्जेदार नाही. बाजारात दर्जेदार मालालाही उठाव नाही. त्यामुळे घाऊक, किरकोळ बाजारातील भाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली.

शेवगा, गवार आणि दोडक्‍याचा भाव किरकोळ बाजारात प्रति किलो शंभर रुपयांवर गेला आहे. तर कोथिंबीर जुडी ६० रुपयांवर आहे.

तरकारी विभागात रोज १०० ते १२५ गाड्यांची आवक होते. आता केवळ ५० ते ६० गाड्यांची आवक होत आहे. मंगळवारी लातूरमधून १२ गाड्या, नाशिक येथून १५, तर जालना येथून ७ गाड्या सर्व भाज्यांची आवक झाली. तसेच सव्वा लाख भाजीपाल्यांच्या जुड्यांचा समावेश होता, अशी माहिती घाऊक बाजारातील भाजीपाल्याचे व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

पावसामुळे पालेभाज्या भिजल्या आहेत. त्याचे खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फळभाज्यापेक्षा पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा आहे. १५० ते २०० गड्ड्यांची विक्री असतानाही केवळ ४० ते ५० गड्ड्यांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळेच पालेभाज्यांच्या गड्डीच्या भावात १० ते २० रुपये, तर फळभाज्यांच्या किलोच्या दरात तब्बल २० ते ३० रुपयांनी वाढ झाली, असे किरकोळ भाज्यांचे विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

भाव वाढल्यामुळे रोज कोणती भाजी करायची, अशी चिंता भेडसावते. आता तर एका भाजीवरच समाधान मानावे लागत आहे.
- संगीता काळे, गृहिणी

किरकोळ बाजारातील किलोचे दर
भाज्यांचे भाव

गवार  १२०
शेवगा  १३०
दोडका  १००
भेंडी   ८०
वांगी   ८०
सिमला मिरची  ८०
कारली  ८०
कांदा ७०-८०

पालेभाज्यांचे जुडीचे भाव
कोथिंबीर  ६०
मेथी  ४०
पालक  ४०
शेपू  ३०
चवळी  ३०
अंबाडी  ३०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetbale rate increase in rain