#गाड्यांची तोडफोड : गुन्हेगारांचा उच्छाद झळ मात्र गरिबांना!

Vehicle-Damage
Vehicle-Damage

पुणे - भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होतो. मात्र, काही टवाळखोरांनी त्यांच्यातील भांडणाचा राग आमच्या गाड्या फोडून काढला. आता रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ५-१० हजार रुपये खर्च येईल. तो कुठून आणि कसा भागवायचा? ही वेदना व्यक्त केली आहे शब्बीर शेख या रिक्षाचालकाने. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटनांचे हे प्रातिनिधिक उदाहरण. गुंड व टोळक्‍यांकडून वाहनांची जाळपोळ व तोडफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची झळ मात्र गरीब, कष्टकरी व नोकरदारांना सहन करावी लागत आहे. अशा घटनांमध्ये वर्षभरात दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वास्तव आहे.

प्रतिस्पर्धी गटावर, टोळक्‍यावर किंवा त्या परिसरातील रहिवाशांवर दहशत बसविण्यासाठी वाहनांची तोडफोड व जाळपोळीचे प्रकार सर्रासपणे केले जात आहेत. बहुतांश घटनांमध्ये रस्त्यांवर उभी केलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत.

तोडफोड होणारे परिसर 
कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धायरी, कात्रज, धनकवडी, औंध, पुणे स्टेशन, खडकी, बोपोडी, वानवडी, अप्पर इंदिरानगर, फुरसुंगी, रामटेकडी या परिसराबरोबरच कसबा पेठेसारख्या मध्यवर्ती भागातही या घटना घडत आहेत. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असून, परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. 

तोडफोड/जाळपोळीची कारणे 
एकमेकांविरुद्ध भांडणाची फिर्याद देणे, खुन्नस काढणे, दहशत निर्माण करणे, पूर्ववैमनस्य, दारूच्या नशेत असणे, दुचाकीला रस्ता न देणे यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे दुचाकी, कार, रिक्षा, टेम्पो, बस, स्कूल व्हॅन, आलिशान गाड्यांपासून ते हातगाड्या, स्टॉल्सचेही सर्रासपणे नुकसान केले जाते. वाहनांच्या तोडफोडीसाठी तलवार, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कोयता, धारदार शस्त्रापासून पेट्रोल, दगड यांसारख्या वस्तूंचा वापर केला जातो.

पोलिसांचा धाक नाही  
अशा घटनांमध्ये पोलिसांकडून आरोपींवर ठोस कारवाई होत नाही. पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटून, त्यांना अशा घटना घडविण्यास अप्रत्यक्षरीत्या बळ मिळत असल्याची सद्यःस्थिती आहे. असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिल्यास त्यांच्याकडूनही त्रास होईल, या भीतीने नागरिकही तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. 

खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसवर मी चालक आहे. २६ नोव्हेंबरला मध्यरात्री माझ्या व मित्राच्या ताब्यातील बससह १०-१५ वाहने कोणीतरी फोडली. हा खर्च आम्ही कसा भरून काढणार? 
- खासगी बसचालक, वारजे माळवाडी

आम्ही कर्ज काढून गाडी घेतली होती. गाडीचे हप्तेही अद्याप फिटलेले नाहीत, तोपर्यंत आमची गाडी फोडली. आता गाडी दुरुस्त करण्याचा खर्च कसा करणार? सर्वसामान्य नागरिकांनी वाहनेच वापरू नयेत का?
- रिक्षाचालक, धनकवडी 

वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्यावरील कारवाईला लवकरच सुरवात होईल. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनीही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com