तीस दुचाक्‍या मालकांना परत

फरासखाना पोलिस ठाणे - विविध गुन्ह्यात जप्त  केलेली दुचाकी वाहने त्यांच्या मुळ मालकांकडे सुपुर्द करताना पोलिस अधिकारी व कर्मचारी.
फरासखाना पोलिस ठाणे - विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने त्यांच्या मुळ मालकांकडे सुपुर्द करताना पोलिस अधिकारी व कर्मचारी.

पुणे - वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या ३० दुचाक्‍या न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकांना परत केल्या आहेत. या संदर्भातील विनंती फरासखाना पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी दुचाकी मालकांना परत देण्याची सूचना फरासखाना पोलिसांना दिली होती. बावचे, सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनानुसार, फरासखाना ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी या संदर्भात न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने दुचाक्‍या परत करण्याचा आदेश दिला. पोलिस संजय क्षीरसागर, नागेश राख व आशाराणी कांबळे यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. 

नावंदे म्हणाले, ‘‘जप्त केलेल्या दुचाक्‍यांचे मालक शहराच्या वेगवेगळ्या भागात राहण्यास आहेत. त्यांना दुचाकीसाठी त्यांच्या कामकाजातून न्यायालयात हजर राहणे शक्‍य नव्हते. ऊन, वारा व पावसामुळे या दुचाक्‍या खराब होण्याबरोबरच अपुऱ्या जागेमुळे त्या ठेवण्याची अडचण निर्माण झाली होती. या सर्व अडचणी आम्ही न्यायालयापुढे मांडल्या. त्यावर न्यायालयानेही दुचाकीचा मालकी हक्क तपासला आणि त्याबाबतचा उल्लेख दोषारोपपत्रामध्ये करण्याचे सांगून दुचाकी मालकांना परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.’’ 

वाहने धूळ खात पडतात
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये लाखोंच्या संख्येने जप्त केलेल्या दुचाक्‍या, चारचाकी वाहने धूळ खात पडून आहेत. पावसाळ्यात या गाड्यांमध्ये पाणी साठून डासांची पैदास होते. धुळीमुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ठाण्यांचा परिसर विद्रूप होतो. अशा गाड्या ठेवायच्या कुठे, असा प्रश्‍न ठाण्यांना भेडसावत आहे. त्यावर दुचाकी त्यांच्या मूळ मालकांना परत करणे, हा चांगला पर्याय होऊ शकतो, हे फरासखाना पोलिसांच्या पुढाकारामुळे स्पष्ट झाले. अन्य पोलिस ठाण्यातही हाच प्रयोग राबविल्यास ठाण्यांचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com