वाहनचालकांना उन्हापासून ‘नेट’मुळे मिळाला दिलासा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली.

पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली.

बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ ठिकाणी हे नेट लावले आहेत, तर २० ठिकाणी दोन दिवसांत नेट लावणार आहे. सिग्नलच्या काहीसे मागे नेट लावल्यामुळे त्या सावलीत वाहनचालक उभे राहत असल्याचे चित्र मध्यभागात रविवारी दिसत होते. एरवी झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणारे वाहनचालक नेटच्या सावलीत थांबत असल्याने झेब्रा क्रॉसिंग मोकळे असल्याचे दिसत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताणही कमी झाला होता. सुमारे ६० बाय ४० फूट आकाराचे हे नेट आहे.

उन्हाळ्यामुळे शहरात सगळीकडेच असे नेट लागले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी ‘सकाळ’च्या फेसबुक लाइव्हमध्ये व्यक्त केली. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचे नेट लावले होते. त्याचे अनुकरण पुण्यातही केले आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्‍वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने तसेच मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोन दिवसांत हे नेट लावण्याची व्यवस्था केली आहे. रासने म्हणाले, ‘‘या नेटमुळे वाहनचालकांना गारवाही मिळणार आहे. तसेच पावसापासूनही त्यांचे काही प्रमाणात संरक्षण होणार आहे. दोन लाख रुपयांत ही सुविधा उपलब्ध केली आहे.’’

Web Title: Vehicle Driver Summer Net Pune City