वाहन नोंदणीसाठी पाचपट शुल्क वाढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

 नव्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करण्यासाठीच्या शुल्कात पाचपट वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच, जुन्या वाहनांच्या हस्तांतर शुल्कातही पाचपट वाढीचा मनोदय व्यक्त केला आहे.

पुणे - नव्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करण्यासाठीच्या शुल्कात पाचपट वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच, जुन्या वाहनांच्या हस्तांतर शुल्कातही पाचपट वाढीचा मनोदय व्यक्त केला आहे. यामुळे नवीन वाहन घेणाऱ्या आणि जुनी वाहने हस्तांतर करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांना नव्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. 

दरम्यान, या दरवाढीच्या प्रस्तावाला वाहतुकीशी संबंधित संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शुल्कवाढीच्या विरोधात येत्या गुरुवार (ता. १)पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना २४ जुलै रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नव्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी, तसेच जुन्या वाहनांचे हस्तांतर करताना नवीन पद्धतीने शुल्क द्यावे लागणार आहे. 

दरम्यान, शुल्कवाढीच्या या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशनचे सचिव बापू भावे यांनी तीव्र विरोध  केला आहे. 

शिंदे म्हणाले, ‘‘इंधनावर अधिभार वाढविण्यात आला आहे. आता वाहनांची खरेदी-विक्री झाल्यावर नोंदणी शुल्कातही भरमसाट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. वाहनांच्या विमा हप्त्यातही या पूर्वीच वाढ झाली आहे. बाजार पेठेत मंदीचे वातावरण आहे. वाहन उत्पादक कंपन्या बंद होत असताना, आता त्यांना लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याविरोधात येत्या गुरुवारपासून आंदोलन करण्यात  येणार आहे.’’ 

याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, त्या नुसार कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

ई-मेलद्वारे स्वीकारणार हरकती-सूचना
मोटार वाहन कायद्यातील शुल्कवाढीच्या या प्रारूपाबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. त्यानंतर त्यांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे केंद्र सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे. नागरिकांना त्यांच्या हरकती- सूचना सहसचिव (मोटार वाहन) jspb_morth@gov.in या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle registration charges will be increased five times