नेहरूनगरमध्ये टोळक्‍याचा धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी - दहशत निर्माण करण्यासाठी नेहरूनगर, विठ्ठलनगर परिसरात दहा जणांच्या टोळक्‍याने पंधरा वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. तीन जणांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

पिंपरी - दहशत निर्माण करण्यासाठी नेहरूनगर, विठ्ठलनगर परिसरात दहा जणांच्या टोळक्‍याने पंधरा वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. तीन जणांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

दिनेश गायकवाड (वय २५, रा. पिंपरी), नारायण शिंदे (वय २०), रिंकू ऊर्फ करण पिटेकर (वय २०, दोघेही रा. बालाजीनगर, भोसरी) व त्यांचे सात-आठ साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश रामदास नेहरकर (वय ३९, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी नेहरकर हे बहिणीला भेटून घरी चालले होते. त्या वेळी दुचाकीवरून हातात धारदार शस्त्र घेऊन आरडाओरडा करीत आलेल्या टोळक्‍याने नेहरकर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन येथे कामावरून घरी चाललेल्या संभाजी म्हस्के या तरुणावरही कोयत्याने वार केले. नेहरूनगर चौकात आणखी एकालाही मारहाण केली. (नाव, पत्ता समजू शकले नाही) नागरिकांवर कोयत्याने वार केल्यानंतरही टोळक्‍याचा धुडगूस सुरूच होता. नेहरूनगर येथील क्रांती चौक, संतोषीमाता चौक, विठ्ठलनगर या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, मोटार अशा १५ वाहनांच्या काचा फोडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर 
सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बढे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: vehicles damage by gang crime