
पुणे : वाहनतळापेक्षा रस्त्यावर द्यावे लागणार जादा शुल्क
पुणे : महापालिका प्रशासनाने रस्त्यावर सशुल्क पार्किंगच्या (Parking) निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या निर्णयाची अंमलबजाणी झाली तर महापालिकेने बांधलेल्या वाहनतळापेक्षा रस्त्यावर गाडी लावल्यास ३० टक्के जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. यामध्ये मध्यवर्ती गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवर चारचाकीला प्रतितास २० रुपये तर दुचाकीला ५ रुपये मोजावे लागणार आहेत.
पुणे महापालिकेने २०१८-१९ मध्ये पे ॲण्ड पार्किंगचे धोरण निश्चित केले. शहरातील प्रमुख ३५ रस्त्यांवर सशुल्क पार्किंग सेवा देण्याचा निर्णय घेतला. पण मतदारांची नाराजी ओढवून त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी त्यांच्या अजेंड्यातून हा विषय बाजूला काढला काढून टाकला होता. महापालिकेत प्रशासक असल्याने आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची सोमवारी (त.९) बैठक झाली.
प्रशासनाने अद्याप कोणत्या रस्त्यावर याची अंमलबजावणी करणार हे स्पष्ट केले नाही. पण शहरातील प्रमुख गर्दीच्या बाजारपेठेतील रस्ते क वर्गवारीत येतात. त्यामुळे तेथे सर्वाधिक पैसे पार्किंगसाठी घेतले जाणार आहेत. या भागातील महापालिकेच्या वाहनतळासाठी जेवढे शुल्क निश्चित केले आहे, त्यापेक्षा ३० टक्के जादा पैसे रस्त्यावर गाडी लावण्यासाठी द्यावे लागणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असे असेल शुल्क
वर्गवारी - वाहनतळ - रस्तावरील पार्किंग (प्रतितास)
अ
कार - ७ - १०
दुचाकी - १ - २
ब
कार - १० - १५
दुचाकी - २ - ३
क
कार - १४ - २०
दुचाकी - ३ - ४
Web Title: Vehicles Parked On The Road Will Be Charged 30 Per Cent More Than Nmc Parking
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..