पुणे : नंबर प्लेटमध्ये गोलमाल! वाहनधारकांच्या विविध क्लृप्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fancy-Number-Plate

काहींना फॅन्सी क्रमांक आवडतो, तर काही दंड चुकविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहन क्रमांक दिसू नये, यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (उच्च सुरक्षा क्रमांक पाटी) काढून ठेवतात.

Number Plate : पुणे : नंबर प्लेटमध्ये गोलमाल! वाहनधारकांच्या विविध क्लृप्त्या

पुणे - काहींना फॅन्सी क्रमांक आवडतो, तर काही दंड चुकविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहन क्रमांक दिसू नये, यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (उच्च सुरक्षा क्रमांक पाटी) काढून ठेवतात. ही सगळी शक्कल वाहनावर कारवाई होऊ नये यासाठी असली, तरी हा सगळा प्रकार आरटीओ प्रशासनाच्या लक्षात आला आहे. त्यामुळे आरटीओ पथकाने थेट अशा वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १३० वाहनांवर करवाई केली आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?

केंद्र सरकारने नंबर प्लेटच्या बाबतीत एकवाक्यता दिसावी म्हणून हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा निर्णय घेतला. केंद्रीय मोटार वाहन अधिनियमातदेखील तशी तरतूद केली आहे. वाहनाच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये सरकारने क्रमांकाचा फॉँट ठरवून दिलेला आहे. सर्वच राज्यातील वाहनांसाठी तो अनिवार्य आहे. याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा असा, की या नंबर प्लेटशी छेडछाड करता येत नाही. यातील क्रमांक लहान किंवा मोठे करणे शक्य नाही. फॅन्सी नंबर टाकणे शक्य नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता राखण्यास मदत होते.

‘आरटीओ’च्या पाहणीत काय?

गाडीची आरटीओ पासिंग झाल्यानंतर अनेकजण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून ठेवतात. त्याजागी फॅन्सी नंबर प्लेट लावतात. यामध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे. काही इलेक्ट्रिक वाहनांची हिरव्या रंगाची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरतात, असे आरटीओच्या पथकाने केलेल्या पाहणीत लक्षात आले. मोटार वाहन निरीक्षक अविनाश दळवी यांच्या पथकातील वंदना शिंदे, दीपा ताम्हणे, पल्लवी रसाळ, लखन कुमार झुणके, दत्तात्रेय शिंदे आदी निरीक्षक अशा वाहनांवर नजर ठेवून कारवाई करीत आहे.

एक हजाराचा दंड!

मोटार वाहन कायद्यानुसार, फॅन्सी नंबर प्लेट लावणे अथवा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून त्या जागी दुसरी नंबर प्लेट वापरणे हा गुन्हा आहे. त्याला एक हजार रुपयांचा दंड आहे. ‘आरटीओ’च्या चौकशीत अन्य काही कागदपत्रे अपुरी असली, तरी कारवाई केली जात आहे.

कधीपासून अनिवार्य?

मोटार वाहन कायद्यानुसार एक एप्रिल २०१९ पासून नोंदणी झालेल्या नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केले आहे.

क्लृप्ती कशासाठी?

शहरात विविध सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्रमांकाचा ठरावीक फॉँट आहे. त्यामुळे संबंधित वाहन कॅमेऱ्याच्या कक्षेत आल्यावर त्याने जर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, तर तत्काळ त्याचा फोटो काढून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, फॅन्सी किंवा अन्य नंबर प्लेट असेल तर तो क्रमांक कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक कारवाई टाळण्यासाठी ही क्लृप्ती लढवीत आहेत.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहील. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची गय केली जाणार नाही.

- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे