ऑनलाइनमध्ये वेल्हे तालुका अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

वेल्हे पंचायत समितीने 'प्रिया' सॉफ्टवेअरचे लेखे जिल्ह्यात सर्वप्रथम पूर्ण करण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. कराचे दर राष्ट्रीय पंचायत पोर्टलवर जिल्ह्यात सर्वप्रथम अपलोड करण्याचा मान वेल्ह्याने पटकाविला आहे. ई-ग्राम सॉफ्टवेअर, इंदिरा आवास घरकुल योजना, "आमचा गाव आमचा विकास' अंतर्गत प्लॅन प्लसमध्ये तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीचे विकास आराखडे नोंदविण्यातही तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे.
- मनोज जाधव, गटविकास अधिकारी

दौंड दुसऱ्या, तर मुळशी तिसऱ्या क्रमांकावर

वेल्हे : "पंचायतराज इन्स्टिट्यूशन्स अकाउंटिंग' (PRIA) सॉफ्टवेअरमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्व लेखे अद्ययावत करून ऑनलाइन माहिती अपलोड करण्यात वेल्हे तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, गटविकास अधिकारी मनोज जाधव आणि तालुका प्रशासनाचे कौतुक केले.

अतिशय दुर्गम व डोंगराळ असलेल्या वेल्हे तालुक्‍यात संपर्क यंत्रणेची मोठी अडचण असताना व संपूर्ण तालुक्‍यासाठी एकच केंद्रचालक नियुक्त असताना जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्‍यांपेक्षा ऑनलाइनचे काम सर्वप्रथम पूर्ण करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केले आहे.

या कामगिरीबद्दल वेल्हे पंचायत समितीच्या सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्या संगीता जेधे व पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यातील कामगिरीनिहाय तालुक्‍याची क्रमवारी :
तालुके ग्रामपंचायतींची संख्या पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या टक्केवारी

वेल्हे 70 70 100
दौंड 80 76 95
मुळशी 95 69 72.63
जुन्नर 140 95 67.85
इंदापूर 115 45 39.15
खेड 163 60 36.80
शिरूर 93 34 36.55
हवेली 100 27 27
मावळ 104 25 24.03
भोर 155 37 23.87
पुरंदर 90 21 23.33
आंबेगाव 103 23 22.33
बारामती 99 19 19.19

Web Title: velhe taluka tops in online