नटसम्राटाला भावपूर्ण निरोप 

shreeram lagoo
shreeram lagoo

पुणे - गेले अनेक दशके रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मराठी रंगभूमीला उंची प्राप्त करून देणाऱ्या आपल्या लाडक्‍या नटाला अखेरचा निरोप देताना रसिकांना अश्रू अनावर झाले. ‘श्रीराम लागू अमर रहे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.  

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, सहआयुक्त रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस बॅंड वादनाने व बंदुकींच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉ. लागू यांचा मुलगा आनंद आणि मुलगी शुभांगी कानिटकर यांच्याकडे भावूक वातावरणात तिरंगा सोपविण्यात आला. कुटुंबीय दीपा लागू, गौरी लागू, प्रसाद लागू, डॉ. श्रीरंग कानेटकर यांच्यासह उर्मिला मातोंडकर, जब्बार पटेल, अभिजित केळकर, डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते. 

रसिकांसह मान्यवरांनी घेतले अंतिम दर्शन
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे अंतिम दर्शन घेतले. या वेळी  डॉक्‍टरांबरोबरच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

डॉ. लागू यांचे पार्थिव काही वेळासाठी त्यांच्या घरी नेण्यात आले होते. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाइकांनी तेथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले. 

या वेळी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, दिग्दर्शक अतुल पेठे, चंद्रकांत कुलकर्णी, सुनील महाजन, शुभांगी गोखले, निवेदक सुधीर गाडगीळ, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव,  अभिनेते राहुल सोलापूरकर,  महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, माजी आमदार मेधा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, अंनिसच्या नंदिनी जाधव यांच्यासह अनेक रसिक प्रेक्षकांनी डॉक्‍टरांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. लागू यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर रांग लावली होती. पोलिसांनी  या वेळी डॉ. लागू यांना  मानवंदना दिली.

दिग्दर्शक जब्बार पटेल म्हणाले, ‘‘नाटककाराने जे लिहिले व दिग्दर्शकाला जे अपेक्षित आहे, ते समजून घेऊन त्यांनी अभिनय केला. केवळ नट म्हणून नाही तर सामाजिक भान असलेली ही व्यक्ती होती.’’

पालेकर म्हणाले, ‘‘माझ्या उमेदीच्या काळात मला डॉ. लागू यांच्याबरोबर काम करायला मिळाले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.’’ 

बापट म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांनी कलाकार म्हणून आदर्श निर्माण केला. पेहरावापासून व्यवहारापर्यंत अगदी सामान्यांसारखे राहणारे हे व्यक्तिमत्त्व. डॉक्‍टर कधीच दमले नाहीत. कलेतून अनेक सामाजिक विषय त्यांनी मांडले.’’  

आढाव म्हणाले, ‘‘सामाजिक अंगाशी निगडित धार्मिक विषयात कलाकारांनी सहभाग घ्यायला हवा. डॉक्‍टर या सर्वांत पुढे होते.’’

फुटाणे म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांनी कोणावरही नास्तिकत्व लादले नाही. एक विचारवंत म्हणून त्यांची उंची मोठी होती. ’’  

चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘‘नियतीवादाला शरण न जाता डॉक्‍टर काम करीत राहिले. मी त्यांच्याकडून केवळ नाटकच नाही तर शिस्त शिकलो. त्यांचे असणे सर्वांसाठीच महत्त्वाचे होते.’’

डॉ. श्रीराम लागू यांचे रंगभूमी व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची वैचारिक भूमिका ही स्पष्ट होती, ती कोणीही विसरू शकणार नाही. त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
-सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकमेव ‘झाकोळ’ या चित्रपटात मला काम दिले. हा माझा पहिला चित्रपट होता. ते खूप थोर कलावंत तर होतेच, पण महान व्यक्ती होते. प्रेरणादायी आयुष्य ते जगले. 
- उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com