लेखक- नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

लेखक- नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

पुणे : दीन, दलित आणि भटक्या-विमुक्तांच्या ज्वलंत प्रश्नांकडे आपल्या संवेदनशील व परखड लेखणीतून लक्ष वेधणारे दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे आज (गुरुवार) सकाळी निधन झाले. 
संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत चव्हाण यांनी मौलिक योगदान दिले आहे. 

ते 65 वर्षांचे होते. कर्करोगाच्या दीर्घ आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे.
 चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. दलित चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. चव्हाण यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातील, तसेच सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. 

समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन उच्चपदस्थ झालेल्या दलितांनी मागे वळून पाहिलेच नाही, अशी खंत चव्हाण व्यक्त करीत असत. भारतीय जातिव्यवस्थेमुळे जात चोरणे आणि सवर्णाचे अनुकरण करणे यामध्येच दलित बांधव धन्यता मानतात, अशी मार्मिक टिपण्णीही चव्हाण यांनी आपल्या लेखनातून, भाषणांतून केली. 

'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'भटक्या-विमुक्तांचे अंतरंग' हे चव्हाण यांचे अनुभव कथन गाजले. 'दलितांचा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'घाणेरीची फुलं' हे त्यांचे व्यकिचित्रण व माहितीपर लेखन संदर्भांसाठी उपयुक्त ठरते. 'बिनचेहऱ्याची माणसं', 'वेदनेच्या वाटेवरून', 'बामनवाडा', 'गावगाडा काल आणि आज' हे कथा लेखन, तसेच 'जाती आणि जमाती' हे सामाजिक लेखन त्यांनी केले. 'पारध', 'पुन्हा साक्षिपुरम' ही नाटके आणि 'निळी पहाट', 'जगण्यासाठी' या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 'जाती व जमाती' या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. 

भटक्या विमुक्तांचे जग व त्यांचे जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. तब्बल ३० वर्षाहून अधिक काळ त्यांनी या विषयासाठी अविचल निष्ठेने स्वतःला वाहून घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्टाबाहेर त्यांनी पदरमोड करून भरपूर भटकंती केली. भटक्या-विमुक्तांच्या पालावर, तांड्यांवर आणि वस्त्यांवर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांच्या मुलाखतींतून, भटकंतीतील निरीक्षणांतून या जमातींविषयी भरपूर माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचे पूर्वेतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विवाह संस्कार, काडीमोड व इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशिलात माहिती गोळा केली. त्याच विपुल माहितीतून त्यांचा 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हा दस्तावेज पाच खंडात प्रसिद्ध झाला. 

भटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घेण्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच या विषयाच्या संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला. पुण्याच्या देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने हे खंड प्रकाशित केले आहेत. २००२ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या खंडात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, काकर, पारधी अशा ११ जमातींवर लिखाण केले आहे. २००४ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसावी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातीवर तर २००६ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या खंडात नंदीबैलवाले, गाढवगोती बेलदार, रायरंद, मरीआईवाला, बहुरूपी, नाथपंथी रावळ या सहा जमातींवर लिखाण केले आहे. २००८ साली प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरवट, घ्यारे कंजर, डक्कलवार अशा सात जमातीचा अभ्यास समाविष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचव्या खंडात दरवेशी, लोहार, तिरमल, बागडी, वेडूवाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातीवर केलेला अभ्यास समाविष्ट आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com