सामान्यांच्या हितासाठी संघर्षशील विचारवंत 

सामान्यांच्या हितासाठी संघर्षशील विचारवंत 

पुणे - ""स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाऱ्या जयप्रकाश नारायण, मधू लिमये, एस. एम. जोशी या विचारवंतांसोबत भाईंनी आयुष्याचा मोठा कालावधी घालवला. समाजवादी विचाराला शक्‍ती देण्याचे कार्य त्यांनी केले. भाईंच्या विचारांच्या हिताची जपणूक करण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना आदरांजली वाहिली. राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही भाईंच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

गिरीश बापट (पालकमंत्री) - भाई वैद्य यांनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगीकारले होते. स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता, शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारे, गोरगरिबांच्या हक्कांसाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभारणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. 

अनिल शिरोळे (खासदार) - संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. मूल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील (विधानसभेतील विरोधी पक्षनेते) - भाई वैद्य यांच्या निधनामुळे मूल्याधिष्ठित संघर्ष करणारे नेतृत्व हरपले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास लोकसेवेसाठी समर्पित होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी लोकशाही आणि समाजवादाच्या मूल्यांसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला आहे. 

डॉ. नीलम गोऱ्हे (आमदार) - भाईंशी माझा दीर्घकाळापासून परिचय होता. विविध विषयांवर निवेदन देणे, चर्चा करणे या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आरोग्य, शिक्षण, असंघटित कामगारांच्या प्रश्‍नांवर ते आग्रही होते. संतुलित आणि विवेकवादी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. 

कपिल पाटील (आमदार) - थोर समाजवादी विचारवंत, संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. सत्यशोधक विचारांचा स्वीकार त्यांनी केला होता. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी ते मंडल आयोगापर्यंत अनेक लढ्यांमध्ये ते अग्रभागी होते. 

डॉ. रावसाहेब कसबे (ज्येष्ठ विचारवंत) - राजकीय नेत्यांमध्ये घुसमटल्यासारखे वाटायचे; पण भाई वैद्य यांचा सहवास नेहमी हवाहवासा वाटायचा. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजवादाला वाहून दिले होते. राष्ट्र सेवा दल आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी नेहमी समाजवाद जोपासला. 

डॉ. हमीद दाभोलकर - सामाजिक विषमता आणि धार्मिक असहिष्णुता वाढत असल्याचा हा काळ आहे. टोकाची सामाजिक विषमता, धर्मनिरपेक्षता धोक्‍यात येण्याच्या कालखंडात भाईंचे नसणे हुरहूर लावणारे आहे. 

रझिया पटेल - समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना भाईंमुळे ऊर्जा मिळायची. लोकशाही समाजवाद म्हणजे काय, हे भाईंचे विचार ऐकले की कळायचे. समाजातील विषमतेच्या विरोधात भाई नेहमी लढा उभा करायचे. 

मुक्ता मनोहर - भाई वैद्य यांना अनेकवेळा भेटण्याचा योग आला. आम्ही केलेल्या आंदोलनांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या सहवासाने आणि अनुभवांच्या शिदोरीने पुढे जाण्याची ताकद मिळायची. 

शमसुद्दीन तांबोळी - हमीद दलवाई यांच्या कार्याबद्दल नितांत आदर असणारे असे भाई वैद्य होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बैठका त्यांच्या घरी होत असत. मंडळाचे वैचारिक अधिष्ठान तपासण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नसायचा. भाईंच्या निधनाने परिवर्तनवादी संघटनांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. 

किरण मोघे - कार्यकर्त्यांवर भाई वैद्य यांचे छायाछत्र होते. महिला, आदिवासी आणि वंचित घटकांतील नागरिकांसाठी त्यांनी भरीव काम केले. ते खूप संवेदनशील होते. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा संवाद कायम असायचा. 

मोहन जोशी - निःस्वार्थी राजकारणी, मंत्री असताना भ्रष्टाचार उघड करणारा सच्चा नेता, समाजवादी विचारवंत आणि तरुणांना सतत मार्गदर्शन करणारा नेता आपल्यातून गेला आहे. 

धनंजय भावलेकर - भाई वैद्य यांच्यावरील माहितीपट निर्मितीचे काम त्यांच्यातील ऊर्जा आणि सकारात्मकतेमुळे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. त्यांच्यातील सकारात्मकता तरुणांना ऊर्जा देणारी होती. 

भीमराव पाटोळे - भाई वैद्य यांनी निःस्वार्थीपणे समाजसेवेचे व्रत अखेरपर्यंत पाळले. जनसामान्यांची पकड असणारा नेता हरपला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com