खंडित वीजपुरवठ्याने घेतला महिलेचा बळी

खंडित वीजपुरवठ्याने घेतला महिलेचा बळी

पुणे- बारा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा... ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटरचा मिनिटा-मिनिटाला संपणारा बॅकअप... क्षणाक्षणाला कमी होणारा श्‍वास... वीज नसल्याने ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटर चार्ज होईना... वैद्यकीय मदत मिळेना... या जगण्यासाठीच्या धडपडीत ७१ वर्षांच्या महिलेला मृत्यूने कवटाळले. ही घटना कोणत्याही आदिवासी जिल्ह्यातील नव्हे, तर आयटी हब, देशातील पहिली ‘स्मार्ट सिटी’ अशा बिरुदावल्या मिरवणाऱ्या पुण्यातील आहे. 

सहकारनगर येथील चव्हाणनगरमधील निर्मल पार्क या सोसायटीतील ही धक्कादायक घटना. सुषमा अशोक पटवर्धन (वय ७१ वर्ष) या महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. त्यामुळे त्यांना ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटरमधून ऑक्‍सिजन घ्यावा लागत असे. गेल्या बुधवारी (ता. २६) या सोसायटी आणि परिसरातील वीजपुरवठा सकाळी दहा वाजता खंडित झाला. वीजपुरवठा लवकरच सुरळीत होईल, या आशेवर पटवर्धन कुटुंबीय होते. वीजपुरवठा कधी सुरू होईल, यासाठी ते वारंवार महावितरणशी संपर्क साधत होते. मात्र, ‘काम सुरू आहे, थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल,’ असे सरकारी उत्तर त्यांना पलीकडून मिळत होते. त्यातच पावसाळी हवेमुळे पटवर्धन यांना श्‍वासोश्‍वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे वारंवार ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटर वापरावा लागत होता. एकदा चार्ज केल्यानंतर ते आठ तास चालू शकत होते. दिवसभर त्याचा वापर झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता ते डिस्चार्ज झाले. त्या स्थितीतही पटवर्धन यांनी दम धरला होता. मात्र, पावसाळी वातावरणामुळे सायंकाळी त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा कुटुंबीयांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ क्रमांकावर संपर्क साधला; परंतु ऑक्‍सिजन सिलिंडर असलेली रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

सहाव्या मजल्यावर राहात असल्याने आणि पावसामुळे त्यांना खाली आणून हॉस्पिटलमध्ये नेणेदेखील कुटुंबीयांना शक्‍य होईना. अखेर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागविली; परंतु ती येईपर्यंत पावणेनऊच्या सुमारास ऑक्‍सिजन न मिळाल्याने पटवर्धन यांची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला; परंतु तोपर्यंत सुषमा पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतला होता. 

वीजबिलाची थकबाकी असेल, महावितरण तत्परतेने ग्राहकांना एसएमएस पाठविते; परंतु वीजपुरवठा खंडित कशामुळे झाला आहे, तो सुरळीत किती वाजता होणार हे, हे कळविण्यासाठी एसएमएस पाठविण्याचे कष्ट महावितरण का घेत नाही. वीजपुरवठा सुरळीत होण्यास खूप वेळ लागणार आहे, याची माहिती महावितरणकडून मिळाली असती तर माझ्या पत्नीला वेळीच रुग्णालयात हलविता आले असते आणि तिचे प्राण वाचले असते. तिच्या मृत्यूला जबाबदार कोण?
- अशोक पटवर्धन

दिवसभरात किमान ५० तक्रारी
पावसाळ्यामुळे एका शाखा कार्यालयामध्ये दिवसभरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी येण्याचे प्रमाण हे किमान पन्नास ते शंभरपर्यंत असते. एका शाखा कार्यालयाकडे २० ते २५ हजार ग्राहकसंख्या असते. पुणे शहरात असे महावितरणची सुमारे १०० ते १२५ शाखा कार्यालये आहेत. पावसाळ्यात एका विभागात किमान एकदा तरी ११०० व्होल्टचा फिडर बंद पडतो. त्यामुळे किमान एक हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होतो. पुणे शहरात असे एकूण नऊ विभाग आहेत. यावरून दिवसभरात शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण किती आहे, हे लक्षात येते. तसेच ग्राहकांना त्याचा फटका कशाप्रकारे बसत असेल, हे यावरून स्पष्ट होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com