‘राष्ट्रवादी’चा विजयोत्सव | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

‘राष्ट्रवादी’चे दोन उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून गुलाल उधळून आणि पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.

पुणे/स्वारगेट - काँग्रेसच्या कार्यालयात सकाळपासून शुकशुकाट होता; तर ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक फेरीअंती उत्कंठा वाढत होती. ‘राष्ट्रवादी’चे दोन उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून गुलाल उधळून आणि पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.

निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात काही प्रमाणात गर्दी होती; तर काँग्रेस भवनात शुकशुकाट होता. मात्र, मतमोजणीनंतर ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत होता. काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी होत नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले व ते कार्यालयाबाहेर पडले. प्रमुख नेतेही कार्यालयात आले नाहीत. मात्र, टिळक रस्त्यावरील ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयामध्ये प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून विजय साजरा केला. यामध्ये खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.

गुलाल उधळून कार्यकर्त्यांचा जल्लोष
‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो,’ ‘महाआघाडीचा विजय असो,’ शरद पवार साहेबांचा विजय असो,’ देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो,’ ‘एकच वादा अजितदादा’ अशा घोषणा दिल्या; तसेच गुलाल उधळून पक्ष विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शहरात राष्ट्रवादीचे चार उमेदवार उभे होते. त्यापैकी दोन निवडून आले. पुणेकरांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी पक्षाचे आमदार विधानसभेत पाठविल्याबद्दल पुणेकरांचे आभार, तसेच आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचेही आभार.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victory of the NCP in pune