विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी यंदापासून शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ चालू शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) नारायण बनसोड आणि सुधा बनसोड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करीत आहे.

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ चालू शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) नारायण बनसोड आणि सुधा बनसोड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करीत आहे.

या शिष्यवृत्तीसाठी बनसोड कुटुंबातील पुष्पा सुंदर, आशा उपासनी, अरुण बनसोड, पद्मा ठुसे आणि प्रदीप बनसोड यांनी फाउंडेशनला १२ लाख रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीच्या व्याजामधून विदर्भातील गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या देण्यात येतील. आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१८ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, वास्तुविशारद किंवा नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी किंवा विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. 

असा करावा अर्ज...
पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी साध्या कागदावर अर्ज करावेत. अर्जात स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक लिहिणे आवश्‍यक आहे. त्यावर मार्च २०१८ च्या उच्च माध्यमिक परीक्षेतील गुण; तसेच पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख करावा. अर्जासोबत गुणपत्रिकेची व उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत जोडावी. हे अर्ज ‘कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११००२’ या पत्त्यावर पाठवावेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी फाउंडेशनमार्फत संपर्क केला जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क -०२०-२४४०५८९५, २४४०५८९७ किंवा २४४०५८९४ (सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०. रविवार व सरकारी सुटीचा दिवस वगळून).

Web Title: Vidarbha Student Scholarship by Sakal India Foundation