विधानसभा निवडणूक निकालाकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. लगतच्या मावळ मतदारसंघातील मतमोजणी मात्र, तळेगावमध्ये होणार आहे. या चारही मतदारसंघातील निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. प्रथम टपाली मतांची मोजणी होईल.

विधानसभा 2019 
पिंपरी - जिवाचे रान करीत प्रचार केला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते राबले. एकदाचे मतदान झाले आणि सर्वांनी सुस्कारा सोडला. गेले दोन दिवस उसंत मिळाली. आता फक्त निकालाची उत्कंठा राहिली. गुरुवारी (ता. 24) सकाळी दहा-साडेदहापर्यंत तीही संपेल. जे आमदार होतील, त्यांचे दिवाळीपूर्वी फटाके वाजतील. 

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदान झाले. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट (मत पडताळणी) यंत्रांच्या पेट्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ठेवल्या आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. लगतच्या मावळ मतदारसंघातील मतमोजणी मात्र, तळेगावमध्ये होणार आहे. या चारही मतदारसंघातील निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. प्रथम टपाली मतांची मोजणी होईल. त्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवली आहेत. आठ वाजता ईव्हीएम यंत्रातील मतमोजणीला सुरवात होईल. 

शहरातील तिन्ही मतदारसंघ मिळून 41 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत पिंपरीतील मतदान चार टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मात्र, चिंचवड व भोसरीतील मतदान अनुक्रमे तीन व दोन टक्‍क्‍यांनी घसरले आहे. तीनही मतदारसंघातील मतदार संख्या वाढूनही मतदानाची टक्केवारी घसरल्याने काहींना चिंता, तर काहींचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाला व किती प्रमाणात कल दिला, याचीही उत्सुकता वाढली आहे. 

व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी 
मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) यंत्रेही होती. त्यामुळे आपण दिलेले मत बरोबर आहे की नाही, हे मतदाराला दिसत होते. त्यातील चिठ्ठ्यांची प्रथम मोजणी करून पडताळणी केली जाईल. यासाठी तीनही मतदारसंघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट यंत्रांतील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. त्याद्वारे व्हीव्हीपॅटमधील मते आणि ईव्हीएममधील मते यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होईल. 

विजयाचे फलक झळकले 
भोसरी मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विजयाचे फलक समर्थकांनी लावले आहेत. त्यावर "परमनंट आमदार' असाही उल्लेख आहे. याबाबत हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की, अतिआत्मविश्‍वास याबाबत चर्चा सुरू आहे. 

विजयाची गणिते 
महायुतीने विद्यमान आमदारांनाच निवडणूक रिंगणात उतरवले आहे. यात पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, चिंचवड, भोसरी व मावळातून भाजपचे अनुक्रमे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व बाळा भेगडे यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात महाआघाडीतील राष्ट्रवादीने माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरीतून तर चिंचवड व भोसरीतून अनुक्रम राहुल कलाटे व माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत केले आहे. मावळात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले सुनील शेळके यांचा समावेश आहे. या सर्वांकडून विजयाची गणिते मांडली जात आहेत. कोणत्या भागात कोणाचे अधिक प्राबल्य आहे, याची आकडेमोड सुरू आहे. विद्यमान आमदार आपली जागा राखतात की त्यात परिवर्तन होणार, परिवर्तनाचा हिरो कोण ठरणार, याचीही चर्चा सुरू आहे. 

तयारी मतमोजणीची 
मतदारसंघ केंद्र टेबल फेऱ्या 
पिंपरी 399 20 20 
चिंचवड 491 22 23 
भोसरी 411 20 21 
मावळ 370 14 27 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidha Sabha 2019 Pimpri Assembly election results