विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

भोसले, येनपुरे, जगताप, वागस्कर रिंगणात; उमेदवारी अर्ज आज भरणार
पुणे - कॉंग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला असून, विद्यमान आमदार अनिल भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजपने ज्येष्ठ नगरसेवक अशोक येनपुरे; तर मनसेने नगरसेवक बाबू वागस्कर यांच्या नावांची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे संजय जगताप, भोसले, येनपुरे आणि वागस्कर बुधवारी (ता. 2) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याची बुधवारची शेवटची मुदत आहे.

पुणे मतदारसंघातील आमदार भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने या जागेसाठी येत्या 19 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, परिषदेच्या एकूण सहा जागांच्या वाटपावरून अद्याप एकमत होत नसल्याने या दोन्ही पक्षांनी आपापला उमेदवार जाहीर केला आहे. कॉंग्रेसने शनिवारी पक्षाच्या बैठकीत जगताप यांचे नाव जाहीर करीत, ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी भोसले यांच्या नावाची मुंबईत घोषणा केली. विशेष म्हणजे, जगताप आणि भोसले हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने आघाडीची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ही निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने केली असून, पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक येनपुरे यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या पक्षाच्या नेत्यांसह येनपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले; तर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतची आपली भूमिका गुलदस्तात ठेवलेल्या मनसेनेही वागस्कर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या चारही पक्षांमध्ये ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.

आघाडीच्या शक्‍यतेबाबत मुंबईत चर्चा?
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत मुंबईत चर्चा होण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असून, तसे झाल्यास पुण्यात या दोघांपैकी एका पक्षाचा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल. मात्र या चर्चेवरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.

Web Title: vidhan parishad election