विलास लांडे, आझम पानसरेंना डावलले

अविनाश चिलेकर
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

अनिल भोसलेंना उमेदवारी दिल्याने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर
पिंपरी - विधान परिषदेला पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही दिग्गजाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांना डावलून पुन्हा अनिल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका निवडणुकीतील समीकरण बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अनिल भोसलेंना उमेदवारी दिल्याने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर
पिंपरी - विधान परिषदेला पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही दिग्गजाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांना डावलून पुन्हा अनिल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका निवडणुकीतील समीकरण बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची निर्विवाद सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. 128 पैकी 92 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. परंतु लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार विजयी झाले. नंतर विधानसभा निवडणुकीत भाजप (चिंचवड), शिवसेना (पिंपरी) आणि एक अपक्ष (भोसरी) असे तीनही राष्ट्रवादी विरोधातील आमदार विजयी झाले.

अजित पवार यांच्या आधिपत्याखालील शहर म्हणून भाजपने या शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले. मागासवर्गीय म्हणून अमर साबळे यांना थेट राज्यसभेची खासदारकी बहाल केली. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिफारशीनुसार ऍड. सचिन पटवर्धन यांना देण्यात आले. अवघे तीन नगरसेवक असलेल्या शहरातील भाजपला अशा प्रकारे बळ देण्यात आले. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनीही नुकताच आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीला हा मोठा दणका होता. आगामी काळात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 35 समर्थक आणि आमदार लांडगे यांचे 12 समर्थक नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सत्तेचा तराजू भाजपच्या दिशेने झुकत चालल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शहर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी लांडे अथवा पानसरे यांना परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती.
राष्ट्रवादीतून लांडे आणि पानसरे यांच्याशिवाय पक्षाचे शहर प्रवक्ते योगेश बहल यांचेही नाव चर्चेत होते. ही निवडणूक अत्यंत खर्चिक असल्याने बहल यांच्याकडेही विचारणा झाली होती; परंतु "मराठा कार्ड'मुळे त्यांचेही नाव मागे पडले. पक्षाची शहरातील परिस्थिती पाहता लांडे यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनाही डावलण्यात आले. विधानसभा, लोकसभेला पराभव झाल्याने पानसरे यांच्या नावाचीही शक्‍यता व्यक्त केली जात होती. एका खासदाराने आणि आमदाराने त्यांची शरद पवार यांच्याकडे शिफारस केली होती. तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रचंड नेटवर्क असलेले नेते म्हणून पानसरे यांना आमदारकी मिळाली, तर राष्ट्रवादीला ताकद मिळेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात त्यांच्याही नावाचा विचार न झाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. ही उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे त्यांच्या नऊ समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत होते. या स्पर्धेत त्यांचे नाव कुठेच चर्चेत आले नाही, आता भोईर काय करणार याची उत्कंठा आहे.

'सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आदरणीय शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. महापालिकेतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्षासाठी आपले कर्तव्य बजावतील यात शंका नाही.''
- योगेश बहल

शिवसेनेचाही उमेदवार?
राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना आपला स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी चाचपणी करत असल्याचे समजले. पिंपरी चिंचवड शहरातूनच एक नाव पुढे येण्याची दाट शक्‍यता असून, उद्यापर्यंत त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: vidhan parishad election candidate anil bhosale