Vidhan Sabha  2019 : पिंपरीत सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

शिवसेनेच्या माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी महिलेच्या श्रीमुखात मारली. 

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले. मात्र पुढील भूमिका घेण्याबाबत दोन्ही पक्षांतील नाराजांची गुप्त खलबते सुरू आहेत. त्याचाच एक परिपाक म्हणजे शिवसेनेच्या माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी महिलेच्या श्रीमुखात मारली. 

महायुतीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडे आणि चिंचवड व भोसरी भाजपकडे गेला. दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अन्य इच्छुकांमध्ये नाराजी आहे. पिंपरीतून शिवसेनेचे तीन व भाजपचे नऊ, चिंचवडमधून शिवसेनेचे दोन व भाजपचे तीन आणि भोसरीतून शिवसेनेचे दोन व भाजपचे चारजण इच्छुक आहेे. भोसरी मतदारसंघ शिवसेनेने मागितला होता. मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली. शिवाय, भाजपने विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली. याबाबत शिवसेनेची भूमिका ठरविण्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. 

त्यात मतभेद झाले. बाजीराव लांडे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवीगाळ केली. त्याला पदाधिकारी महिलेने आक्षेप घेतला.  त्यावरून वादंग निर्माण झाले. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पदाधिकारी महिलेने फिर्याद दिली आहे. कार्यकर्ता अमित शिंदेसह पदाधिकारी महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप लांडे  यांच्यावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha  2019 shivsena Female officer beaten up