esakal | Vidhan Sabha 2019 : शहरात १६५ उमेदवारांचे अर्ज वैध
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 :  शहरात १६५ उमेदवारांचे अर्ज  वैध

Vidhan Sabha 2019 : शहरात १६५ उमेदवारांचे अर्ज वैध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत २०८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीत ४३ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत, तर १६५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार (ता. ७) पर्यंत आहे. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक २७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत, तर शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातून एकाही उमेदवाराचा  अर्ज बाद झाला नाही.

जिल्ह्यामध्ये ७१ अर्ज बाद
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत एकूण ४४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७१ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३७३ उमेदवार सध्या निवडणुकीच्या 
रिंगणात आहेत.

शिवाजीनगरमधील सर्व उमेदवार पात्र
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीमध्ये अर्ज व्यवस्थित व बिनचूक भरल्याने सर्व १३ उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरले आहेत. सोमवारी (ता. ७) अर्ज माघारीचा दिवस असून, त्यानंतर शिवाजीनगरमधील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता अर्जांच्या छाननीस सुरवात झाली, त्या वेळी उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे सुहास निम्हण, ‘आप’चे मुकुंद किर्दत, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह १३ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. छाननीमध्ये उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. कोणीही हरकत न घेतल्याने सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले.

कसब्यात कमी वयाच्या  उमेदवाराचा अर्ज नामंजूर
कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेंद्र पावटेकर या अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला. त्याचे वय २५ वर्षांपेक्षा कमी होते. त्यामुळे अर्ज बाद केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.मतदारसंघात १३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

कोथरूडमध्ये चौघांचे अर्ज अवैध

कोथरूड विधानसभा मतदारसंघात २५ पैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले. त्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या डमी अर्जाचाही समावेश आहे. मतदारसंघातून २१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत. स्वप्नील दुधाणे आणि लक्ष्मी दुधाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते; परंतु त्यांनी अर्जासोबत पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म दिला नव्हता. सुहास गजरमल या अपक्ष उमेदवाराने शपथपत्रासह आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती.  त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविल्याची माहिती अहिरराव यांनी दिली.

पर्वतीत अपक्षाचा अर्ज नामंजूर 
पर्वती मतदारसंघासाठी दाखल झालेल्या सोळापैकी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज शनिवारी नामंजूर करण्यात आला. दीपक घुबे असे त्या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी अर्ज अपूर्ण भरल्याने तो नामंजूर केला आहे. 

काँग्रेसचे नगरसेवक बंडखोर उमेदवार आबा बागूल यांचा अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मंजूर झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचे पती नितीन कदम यांचाही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही मंजूर झाला आहे. पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड यांनी छाननी केली.

वडगाव शेरी मतदारसंघात  सहा उमेदवारी अर्ज अपात्र
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरले, तर १७ जण पात्र ठरले. 

उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी झाली.

भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांचे दोन अर्ज व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या समवेत अर्ज दाखल करणारे बापू पठारे यांचे ‘डमी’ अर्ज या वेळी अपात्र ठरले. ३२ पैकी २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या २३ जणांपैकी सहा जणांचे अर्ज अपात्र ठरले, तर १७ जणांचे अर्ज पात्र ठरल्याचे संजीव देशमुख यांनी  स्पष्ट केले.  

पुणे कॅंटोन्मेंटमध्ये २७ अर्ज अवैध
कॅंटोन्मेंट : पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८५ उमेदवारांनी ८९ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५८ अर्ज वैध झाले असून, २७ अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. युतीचे सुनील कांबळे, आघाडीचे रमेश बागवे, वंचितचे लक्ष्मण आरडे, एमआयएमच्या हीना मोमीन, आपचे खेमदेव सोनवणे, मनसेच्या मनीषा सरोदे, बहुजन मुक्ती पार्टीचे हुलगेश चलवादी यांच्यासह बंडखोरी केलेले काँग्रेसचे सदानंद शेट्टी, भाजपचे भरत वैरागे, शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांच्यासह उर्वरित अपक्षांचे अर्ज वैध ठरले.

हडपसरमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज बाद
हडपसर मतदारसंघात दोन अपक्ष उमेदवार नूरजहाँ शेख आणि विकास अस्थूळ यांचे अर्ज अवैध ठरविले. वैध उमेदवारांची नावे ः योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप), दीपक महादेव जाधव (बसप), चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस), वसंत कृष्णा मोरे (मनसे), झाहिद इब्राहिम शेख (एमआयएम), शशिकांत अशोक गायकवाड (हिंदुस्थान जनता पार्टी), कृपाल कृष्णराव पलुसकर (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), घनश्‍याम आनंद हाके (वंचित बहुजन आघाडी). अपक्ष उमेदवार : अ. सईद अराकाटी, ॲड. तौसिफ शेख, खंडू सतीश लोंढे, राकेश हरकू वाल्मीकी, गंगाधर विठ्ठल बधे, अल्ताफ करीम शेख, अर्जुन शिरसट, सुभाष काशिनाथ सरवदे, अंजुम झकेरिया इनामदार, मोहम्मद जमीर शेख, अनुप शिंदे.