Vidhan Sabha 2019 : अर्ज भरल्यापासून अजित पवार बारामतीतून बेपत्ता; थेट घेणार समारोपाची सभा

Vidhan Sabha 2019 ncp leader ajit pawar last rally at baramati pune
Vidhan Sabha 2019 ncp leader ajit pawar last rally at baramati pune

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शनिवारी (18 ऑक्टोबर) बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचारप्रमुख बाळासाहेब तावरे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर तसेच ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ही माहिती दिली.

राज्यातील एकमेव उमेदवार
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी न फिरता राज्यभर पक्षाच्या उमेदवारांच्या सभा घ्यायच्या आणि थेट सांगता सभेलाच बारामतीत यायचे, म्हणजे प्रचाराचा नारळ वाढविण्याची सभा करुन पंधरवड्यानंतर थेट सांगता सभेलाच मतदारांपुढे येऊन भाषण करायचे हे फक्त बारामतीतच शक्य होऊ शकते. अजित पवार यांच्या बाबतीत ही बाब शक्य झालेली आहे असेच म्हणावे लागेल. 4 ऑक्टोबरला अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सभा घेतली आणि आता थेट 19 ऑक्टोबरला सांगता सभेतच पवार सभेच्या निमित्ताने मतदारांपुढे जाणार आहेत. मतदारांवर असलेल्या विश्वासामुळेच व त्यांनी राज्यभर फिरण्याची परवानगी दिलेली असल्यानेच मी बारामतीकरांच्या भरवशावरच राज्यभर फिरु शकतो, असे अजित पवार सांगतात.

सातव्यांदा निवडणूक रिंगणात
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत घेण्याची राष्ट्रवादीची परंपरा आहे. त्या नुसारच दुपारी तीन वाजता मिशन ग्राऊंडवर ही सभा होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व अजित पवार या सभेस उपस्थित राहणार आहेत. दर वर्षी अजित पवार यांना बारामतीत प्रचारासाठी अडकवून ठेवण्याची व्यूहरचना विरोधकांकडून केली जाते. मात्र, त्याला पवारांकडून फारशी दाद दिली जात नाही. यंदाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री क्षेत्र कण्हेरी येथे सभा घेतल्यानंतर अजित पवार राज्यात सगळीकडे फिरले. पण, बारातमीकडे फिरकलेच नाहीत. पवार कुटुंबियातील सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, रणजित पवार, पार्थ पवार, जय पवार, विजया पाटील, नीता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेत गावोगाव कोपरा सभा व पदयात्रांद्वारे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. सांगता सभेत शरद पवार काय बोलणार याकडे आता बारामतीकरांचे लक्ष आहे. सातव्यांदा अजित पवार विधानसभेसाठी रिंगणात असून, एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com