Vidhan Sabha 2019: मतदारसंघांवर पोलिसांची करडी नजर

Vidhan Sabha 2019: मतदारसंघांवर पोलिसांची करडी नजर

विधानसभा 2019 : 
पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत आठ विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र आहे. याठिकाणी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी निवडणूक विभागासह पोलिस प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. तब्बल साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त सर्वत्र तैनात केला आहे. त्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, रेल्वे पोलिस दल व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे. रविवारी (ता. २०) मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात केंद्रांवर पोचविण्यात आली. 

गैरप्रकार रोखण्यासाठी ३९ भरारी पथके आणि ३९ स्थिर पथके, अशी एकूण ७८ पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली. यासह उमेदवारांचे निवासस्थान, प्रमुख रस्ते, चौक व ज्या भागात वाद होण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. रात्रीची गस्तही वाढविण्यात आली. आयुक्तालयाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या बारा चेकपोस्टच्या ठिकाणीही वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. रविवारी रात्री वाहन तपासणीवर अधिक भर देण्यात आला. 

दारूसाठा जप्त
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी (ता. १८) भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणच्या कारवाईत एक लाख १५ हजारांचा दारूसाठा जप्त केला. तसेच एका गुन्ह्यातील फरारी आरोपीला ताब्यात घेतले. वाकड ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. १९) दहा हजारांची, तर हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील कारवाईत नऊ हजारांची दारू जप्त केली. तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाने निघोजे येथील कुरणे वस्तीतील इंद्रायणी नदीलगत असलेली हातभट्टी उदध्वस्त केली. यामध्ये साडेआठ लाखांचा माल नष्ट झाला. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथे मोटारीतून पंधरा हजारांची दारू घेऊन जाणाऱ्याला मोटारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी येथील भीमा नदीकाठच्या दोन हातभट्ट्या उदध्वस्त केल्या. यामध्ये एक लाख ३२ हजारांचा साठा नष्ट करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com