बारामतीत २०२४ मध्ये नक्की परिवर्तन - पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

जरा पवारांना सांगा...
राज्यातही आपलंच सरकार येणार आहे, असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला, की येणार आहे की नाही आपलं सरकार? लोकांनी होकार देताच...मग जरा सांगा पवारांना...त्यांना अजून वाटतंय की त्यांचंच येणार आहे; पण निवडणुकीनंतर मी नियमित बारामतीला वेळ देणार आहे. लोकांना आपली पार्टी वाटावी, असे काम मी करणार आहे.

बारामती शहर - विधानसभेला बारामतीत जिंकणे, हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा होईल. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. बारामतीत नक्की परिवर्तन होईल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

बारामतीतील भाजप कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर पाटील म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकसभा व विधानसभेला दरवेळेस कोणीतरी नवीन माणूस दिला गेला. निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले. सातत्याने पाच वर्षे प्रयत्न केले तरच रिझल्ट मिळतात. भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे. पुढील पाच वर्षे सातत्याने लोकांचे काम करण्याची रचना करण्यासाठी कार्यालयाची गरज होती. त्यामुळे बारामतीत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला.’’ लोकसभेच्या निकालाच्या वेळेस खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील, याची खात्री वाटत नव्हती, अशी लढत भाजपने दिली. 

सूत्रसंचालन प्रशांत सातव यांनी केले. प्रास्ताविक अविनाश मोटे यांनी केले. स्वागत सुरेंद्र जेवरे यांनी केले. पृथ्वीराज जाचक यांनी त्यांचा बंगला कार्यालयासाठी दिल्याचा उल्लेख करून चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित जाचक यांना म्हणाले, ‘‘काय, तुम्हालाही चार फोन एव्हाना आलेच असतील ना.’’ त्यावर जाचकांनी २००४ मध्ये हाच बंगला भाजपचेच कार्यालय होते, अशी आठवण पाटील यांना करून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 baramati Constituency Politics NCP BJP Chandrakant Patil