Vidhansabha 2019 : संधीचा फायदा नक्की कोण उचलणार?

Balasaheb-and-Chandrakant
Balasaheb-and-Chandrakant

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस आणि भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेल, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना पाच कार्याध्यक्षांचे ‘मूड’ सांभाळत पक्षाची पडझड होणार नाही, यावर लक्ष द्यावे लागेल. प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता पुण्यातील संघटनात्मक पातळीवरही दोन्ही पक्षांत बदल अपेक्षित आहेत.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सध्या त्यांचा पक्ष काय करणार?, यापेक्षाही ‘विरोधी पक्षातील हा आमदार आमच्याकडे येणार’, ‘हे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना फोन करतात’, ‘छगन भुजबळ, अजित पवार यांना पक्षात का घेतले नाही?’, अशाच गोष्टी करीत आहेत. ज्यांनी निष्ठेने पक्ष वाढविला आणि वर्षानुवर्षे विरोधात राहून भाजप जिवंत ठेवला त्यांना संधी मिळण्याचे दिवस असताना भाजपमध्ये आयारामांचीच चलती सुरू आहे. या आयारामांच्या बळावरच विधानसभेच्या २१५-२२० जागा जिंकण्याची स्वप्नही पाहिली जात आहेत. पक्ष वाढविण्यासाठी हे करणे अनेकदा अपरिहार्य असते, पण तुमचे लक्ष केवळ विरोधी पक्षातील व्यक्ती फोडून मोठे होण्यावर असेल, तर मतदारही तुमचा पर्याय का निवडावा, याचा विचार आज ना उद्या नक्की करतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी तुमची निवड केली आहे, जर तुम्ही पुन्हा तेच ते लोक मतदारांच्या माथी मारायला लागला, तर हा पर्याय निश्‍चितच जास्त काळ टिकणार नाही. लोकसभा निवडणुकीपासूनच मतदारांमध्ये हा विषय चर्चेला जाऊ लागला आहे, त्यामुळे चंद्रकांतदादा ‘जरा दमानं’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाणीवपूर्वक पश्‍चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात उरला सुरला राष्ट्रवादीचा विरोध मोडून काढण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालावा लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते फोडूनच पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप वाढवली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पाटील आणि गिरीश महाजन ही जोडी फोडाफोडीच्या राजकारणात हातखंडा ठरली. हाच प्रयोग विधानसभेत राबवावा, हा भाजपचा प्लॅन असल्यास नवल वाटायला नको. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाला ‘टार्गेट’ करून इतर मतदारसंघांवर भाजपने ‘फोकस’ केला. हीच नीती या वेळी असेल. अजित पवार, जयंत पाटील यांचे मतदारसंघ ‘टार्गेट’ करून या दोन्ही नेत्यांना मतदारसंघाबाहेर पडता येणार नाही, अशी भाजपची व्यूहरचना असेल. पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे नाराज हाती लागतात का? यावर चंद्रकांत पाटील यांचा भर असेल. पुणे शहरात संघटनात्मक पातळीवर बदलांचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे पाटील यांची राजकीय गणिते निश्‍चित आहेत. त्याला राष्ट्रवादी कसा प्रतिकार करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये गेल्याचा राग काँग्रेसमध्ये आहेच. त्यांना धडा शिकविण्यासाठी आणि गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. अर्थात, मृदूभाषी थोरातांचा पहिला सामना होणार आहे, तो पक्षातील ढुड्डाचार्यांशीच. दाही दिशा तोंड असणारे हे नेते एकत्र आणणे, पक्षातील पडझड रोखणे आणि सततच्या पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना बळ देणे, असे अवघड काम त्यांना करावे लागणार आहे. त्यातच थोरात यांच्या मदतीसाठी पाच कार्याध्यक्ष नेमले आहेत. अर्थात, कार्याध्यक्षांचा यापूर्वीचा अनुभव कोणालाही चांगला नाही. अध्यक्ष-कार्याध्यक्ष यांच्यातच हेवेदावे वाढण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे या कार्याध्यक्षांना सांभाळण्याचे कसबही थोरातांना करावे लागेल. आमदार विश्‍वजित कदम यांच्यावर सोपविलेल्या कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे पुणे शहरात काँग्रेसला मदत होणार आहे. कदम यांच्या पाठीशी पुण्याचे ‘बरे-वाईट’ अनुभव आहेत. त्यामुळे त्यांना आता पुण्यात अधिक लक्ष घालून काम करणाऱ्यांना संधी देण्यासाठी आग्रही राहायला हवे. 

पाटील यांच्याकडे ‘फॉर्म’मध्ये असणारी सत्तेतील ‘यजमान’ टीम आहे. थोरातांना विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंड संघासारखी संधी निर्माण करावी लागणार आहे. शेवटी विधानसभेच्या ‘सुपर ओव्हर’मध्ये कोणत्या निकषांवर विजय ठरवणार, हे बघणं ‘इंटरेस्टिंग’ असणार, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com