#कारणराजकारण : रोजगाराअभावी तरुणांचे स्थलांतर (व्हिडिओ)

Bhor-Vidhansabha-Constituency
Bhor-Vidhansabha-Constituency

वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ
रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘एमआयडीसी’ची प्रतीक्षा आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार होईल, असे चित्र या विधानसभा मतदारसंघात दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तो भाग या मतदारसंघात आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांचा वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. भोर संस्थान भारतात विलीन होऊन ७० वर्षे उलटली. त्यानंतर आतापर्यंत विधानसभेच्या १२ निवडणुका झाल्या. बारापैकी नऊ वेळा काँग्रेसने या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व ठेवले. अनंतराव थोपटे हे १९७२ मध्ये प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले, तर त्यानंतरच्या (१९७८) निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे संपतराव जेधे विजयी झाले. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर एकदा विजय नोंदवला. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस फुटून बाहेर पडली त्या वर्षी, म्हणजे १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काशिनाथ खुटवड यांनी बाजी मारली. खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीने सातत्याने भोरच्या जागेवर हक्क सांगितला. पण, आघाडीच्या तडजोडीमध्ये ही जागा काँग्रेसला मिळाली, त्यामुळे काँग्रेसचा सलग आमदार असूनही विधानसभा मतदारसंघात रक्तपेढी नाही, की रक्त साठवणूक केंद्र नाही, याबद्दल नागरिक, डॉक्‍टर प्रकर्षाने बोलत असल्याचे जाणवते. भोरमधील रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्ताची गरज असेल तर पहिली रक्तपेढी ही ४५ किलोमीटरवर पुण्यातील भारती हॉस्पिटलची आहे. रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाइकाला पुणे गाठावे लागते, ही परिस्थिती कधी बदलणार, असा सवाल आता येथील रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. 

रस्ते अन्‌ वाहतूक सुविधाही नाही
भोरला कोकणाशी जोडणारा मार्ग गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. रस्त्यांची दुरवस्था यामुळे रुग्णाला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, ही मोठी कसरत असते. काही वेळेला तर ते रुग्णाच्या प्राणावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

मतदार  प्रतिक्रिया
भोर एमआयडीसीसाठी कोणीही प्रयत्न करत नाही. येथील रहिवाशांची फक्त दिशाभूल होत आहे. हजारो लोक दिवस उजेडण्याआधी पुणे शहरात कामाला जातात ते दिवस मावळल्यावर गावात येतात. त्यांना भोरचा सूर्यदेखील पाहायला मिळत नाही.  
- राजेश शिंदे

सध्याचे लोकप्रतिनिधी भोरच्या प्रश्नांपेक्षा विधानसभेच्या तयारीत मग्न आहेत. येथील रस्ते इतके निकृष्ट आहेत की चारचाकी वाहनामध्ये बसलो आहोत की बैलगाडीमध्ये, हेच समजत नाही. लोकप्रतिनिधी प्रश्नांचा पाठपुरावा करीत नाहीत. 
- केदार देशपांडे

भोरमधील उपजिल्हा रुग्णालयात तुटपुंजे मनुष्यबळ आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता आहे. आपत्कालीन स्थितीत औषध उपचार पुरविला जात नाही. बॅंकेची सुविधा देखील नाही.
- मनीषा राजीवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com