Vidhansabha 2019 : संधी प्रयोगांची अन् बदलांचीही!

संभाजी पाटील
Sunday, 28 July 2019

‘पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार की नेत्यांच्या घोषणा हवेतच विरणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पुण्यात भाजपला भाकरी फिरविण्याची संधी आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नवे चेहरे दिल्याशिवाय पर्याय नाही.

‘पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार की नेत्यांच्या घोषणा हवेतच विरणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पुण्यात भाजपला भाकरी फिरविण्याची संधी आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नवे चेहरे दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विधानसभेत जाण्याची किती नव्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होणार, याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांच्या मुलाखतींचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील मतदारसंघांच्या मुलाखतींची औपचारिकता पार पाडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पुण्याबाबत चाचपणी केली. गेल्या पाच वर्षांत पुण्यातील राजकारणावर भाजपने सर्वार्थाने ठसा उमटविला आहे. महापालिका ते खासदारकी अशा सर्व पातळीवर भाजपचे वर्चस्व असल्याने विधानसभा निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरेल. लोकसभा निवडणुकीत भाजपने मताधिक्‍यात वाढ करून पुण्याची तटबंदी भक्कम केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी पुण्यातील विधानसभा निवडणूक सोपी नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपने केवळ आपल्या जागा वाढविणे, सध्या असणाऱ्या जागांवरील मताधिक्‍य वाढविणे, यावर भर दिला. त्यासाठी उमेदवार देताना विविध प्रयोग करून नव्यांना संधीही दिली. लोकसभा निवडणुकीत पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत मताधिक्‍य मिळाले. कोथरूड, कसबा, पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला या पाच मतदारसंघांतील मताधिक्‍य मोठे होते. त्यामुळे या पाच जागांवर भाजपचा कोणीही उमेदवार दिला तरी जिंकणार, असा आत्मविश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. अर्थात, शिवाजीनगर या एकमेव मतदारसंघात भाजपचे सर्वच्या सर्व नगरसेवक विजयी झाले आहेत. या मतदारसंघातही भाजपला अनुकूल असेच वातावरण आहे. त्यामुळे या सहाही मतदारसंघांत भाजप नव्यांना संधी देऊन काही प्रयोग करणार की विद्यमानांनाच पुन्हा उमेदवारी बहाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शहरातील आठही मतदारसंघांत दुसऱ्या फळीतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्या सर्वांना संधी देताना भाजपला कसरत करावी लागणार आहे. विद्यमान आमदारांच्या जागा ज्या त्या पक्षाकडे असतील, असे युतीचे धोरण असल्याने शिवसेना अथवा मित्रपक्षाला पुण्यात एकही जागा मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरेल. काँग्रेसच्या वतीने पुण्यात ५३ जणांनी विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांमध्ये जुन्या-नव्यांची सरमिसळ आहे. काँग्रेसला पुण्यात आठपैकी चार जागा हव्या आहेत.

त्यातील कसबा आणि शिवाजीनगरमध्ये इच्छुकांची संख्या साहजिकच जास्त आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडे भाजपला चांगली टक्कर देतील असे उमेदवार आहेत. या ठिकाणी गटबाजी न करता विजय खेचून आणण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली, तर चांगली लढत होऊ शकते. पुणे कॅंटोन्मेंटबाबत भाजप काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये नवे चेहरे देण्याशिवाय पर्याय नाही. हडपसर, खडकवासला मतदारसंघांत या पक्षाला आशा आहेत. तेथे अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे नव्या इच्छुकांना संधीची सर्वाधिक शक्‍यता आहे. वडगाव शेरीतही राष्ट्रवादीला गावकी-भावकी बाजूला ठेवत बदललेल्या भौगोलिक रचना आणि नागरिकीकरणाचा विचार उमेदवारी देताना करावा लागेल. बदलत्या राजकीय संदर्भात नव्या प्रयोगांशिवाय कोणाला पर्याय नाही, हे मात्र खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Chandrakant Patil NCP Ajit Pawar Politics