Vidhansabha 2019 : आता इनिंग इच्छुकांची!

संभाजी पाटील
शनिवार, 25 मे 2019

असा वाढला भाजपचा टक्का 
  २००९ : दोन लाख ५४ हजार  
  २०१४ : पाच लाख ६९ हजार  
  २०१९ : सहा लाख ३२ हजार

भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का? 
पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची संख्याही वाढली असून, घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेला पुण्यात एकतरी जागा मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सातत्याने पुण्यात आपल्या मतांचा टक्का वाढविला आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर लढून शहरातील आठही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही शहरातील शंभर जागा जिंकून मतांचा हा आलेख चढता ठेवला. त्यापुढे जाऊन लोकसभेच्या आताच्या निवडणुकीत भाजपने ६ लाख ३२ हजार ८३५ मतांचा उच्चांकी टप्पा गाठला. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच सहा लाखांचा टप्पा पार केला. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ५ लाख ६९ हजार ८२५ मते मिळाली होती. त्यात वाढ झाली आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत दोन लाख ५४ हजार मते मिळाली होती. या वेळी त्यात वाढ होऊन, तीन लाख आठ हजारांपर्यंत हा आकडा गेला आहे. तरीही काँग्रेसच्या मतांचा टक्का गेल्या काही निवडणुकींच्या तुलनेत कमीच आहे. काँग्रेसला १९९८ मध्ये विठ्ठल तुपे उमेदवार असताना ४ लाख ३४ हजार मते मिळाली होती. हा आकडा २००४ मध्ये तीन लाख ७३ हजारांवर गेला. २००९ मध्ये तो दोन लाख ७९ हजारांवर राहिला. या उलट २०१४ पासून भाजपला मतदारांची पसंती वाढलेली दिसते.

बापट यांना सहाही लोकसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली. कोथरूडमध्ये १.४९ लाख, वडगावशेरी १.१७ लाख, पर्वती १.१६ लाख, कसबा १.०३ लाख मते मिळाली. ती गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त आहेत. पुणे कॅंटोंन्मेंट विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्‍य कमी झाले असले तरी या मतदारसंघात मिळालेल्या मतांमध्ये मात्र पाच हजारांची वाढच झाली आहे. गेल्या निवडणुकीत शिरोळे यांना ६३ हजार ७९०, तर बापट यांना ७७ हजार ९८२ मते मिळाली आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात मात्र भाजपची मते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक हजाराने घटली आहेत. 

भाजपच्या या मतांमध्ये शिवसेना आणि घटक पक्षांचा सहभाग आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीची शक्‍यता असल्याने पुण्यात शिवसेनेला जागा सोडणार काय, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शिवसेनेला ज्या जागांची अपेक्षा आहे, त्या कोथरूड, वडगावशेरी या जागांवर भाजप अधिक सक्षम झाला आहे. त्यामुळे शहरातील आठ जागांपैकी नेमक्‍या किती आणि कोणत्या जागा शिवसेनेला मिळणार हा पेच राहणार आहे. भाजपमध्ये मात्र शहरातील आठही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Shivsena Yuti Interested Candidate Politics