Vidhansabha 2019 : काँग्रेस आघाडी भोपळा फोडणार का?

Pune-Pimpri-Chinchwad
Pune-Pimpri-Chinchwad

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आघाडीच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावून महापालिका आणि विधानसभेत वर्चस्व निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍यही वाढले. त्यामुळे आघाडीला जिवाचे रान करावे लागेल, तर भाजपला गड राखावा लागेल. शिवसेना नेमकी काय करणार, हा कळीचा मुद्दा आहे.

‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत ‘सगळ्यांना’ सोबत घेऊन विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रोखणे हे पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल. देशभरात असलेली नरेंद्र मोदी लाट आणि नवमतदारांमुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या बदलांचा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला फायदा होताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत मिळालेले शतप्रतिशत यश आणि प्रत्येक मतदारसंघावरची भाजपची पकड, या जमेच्या बाजूंचा विचार केल्यास, काँग्रेस आघाडीसाठी ही विधानसभेची लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमेदवार कोण? याची चाचपणी सुरू असताना, पुण्यातील आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन जागांसाठी भाजप-शिवसेना युतीत मात्र इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे विद्यमानांना बाजूला करून नव्यांना संधी मिळणार काय, याबाबत उत्सुकता आहे. 

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाखांचे मताधिक्‍य मिळवून पुण्यात भाजपने विरोधकांचे उरले-सुरले अवसान काढून घेतले. सोबतच अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्येही पार्थ अजित पवार यांचा सव्वादोन लाखांनी पराभव करून राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीचे बडे नेते पक्षांतर करीत आहेत. अशा वातावरणात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस आघाडीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही जागा भाजपने जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादीकडील पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिका भाजपने हस्तगत केल्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत काँग्रेस आघाडीला आपला प्रभाव दाखवता आलेला नाही. त्यामुळे एका बाजूला पक्षाची पडझड रोखायची आणि दुसरीकडे सक्षम उमेदवार द्यायचे, अशी दुहेरी कसरत काँग्रेस आघाडीला करावी लागणार आहे. पुण्यात भाजपचे आठही आमदार असल्याने याठिकाणी शिवसेनेला जागा मिळण्याची शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

गिरीश बापट हे लोकसभेवर निवडून गेल्याने कसबा मतदारसंघात पंचवीस वर्षांनंतर प्रथमच दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी आहे. आघाडीत या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. बापट नसल्याने या मतदारसंघात काँग्रेस इच्छुकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यासह काँग्रेसमधील इच्छुकांची यादीदेखील मोठी आहे. शहरातील आठपैकी हडपसर, खडकवासला, कोथरूड आणि वडगावशेरी हे चार राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट आणि पर्वती या चार मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे.

भाजपला आठही मतदारसंघांमधून विजयाची खात्री आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या साहजिकच जास्त आहे. काही मतदारसंघांत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने ते मतदारसंघ कोणते, याविषयी उत्सुकता आहे. शिवाजीनगर, पुणे कॅन्टोमेंट आणि वडगावशेरीमध्ये वंचित आघाडीचा प्रभाव राहील. 

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड आणि भोसरी हे दोन मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडे असून, हेच सूत्र यंदाच्या निवडणुकीतही कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेस येथे काँग्रेसला जागा सोडणार का, याविषयी उत्सुकता आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत मनोमिलन केल्याने त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला फायदा होईल. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी अजित पवार उमेदवारी वाटप करताना काय जादू करणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्हीही शहरांत काँग्रेस आघाडीला खाते उघडण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार, हे मात्र नक्की! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com