#Vidhansabha 2019 : काँग्रेसच्या दोन वॉर रूम सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

आगामी काळात सोशल मीडियावरून काँग्रेस आक्रमपणे प्रचार करणार आहे. भाजप न केलेल्या गोष्टींचाही वापर प्रचारात करीत आहे. हा प्रकार काँग्रेस उघड करणार आहे. नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून काँग्रेस आपल्या ध्येय धोरणांचा प्रचार करणार आहे. 
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

पुणे - भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही शहरात दोन ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. सोशल मीडियाची विविध आयुधे वापरून काँग्रेसने आक्रमक प्रचाराची रणनीती तयार केली आहे. 

काँग्रेस भवनमध्ये या ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. त्यात युवकांसाठी आणि शहर काँग्रेससाठी दोन स्वतंत्र युनिट आहेत. पक्षाचे शहरात ११ ब्लॉक आहेत. सोशल मीडियासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये एक प्रतिनिधी नियुक्त केला आहे. त्याच्या मदतीला पाच-सहा जणांची चमू असेल. ब्लॉकनुसारच व्हॉट्‌सॲपचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. तसेच दररोज कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या याबाबतचा निर्णय ‘वॉर रूम’मधून घेतला जातो. त्यानुसार त्या पोस्ट तयार करून संबंधित कार्यकर्त्यांपर्यंत पोचविल्या जातात. पक्षाचे सुमारे ५२ कार्यकर्ते यासाठी कार्यरत आहेत. त्यांना व्हॉट्‌सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर आदींचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दोन्ही ‘वॉर रूम’ पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय कार्यालयांशी संलग्न आहेत. 

‘शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील न सुटलेले प्रश्‍न, समस्या आदींबाबत स्थानिक पातळीवर पोस्ट तयार करून त्याचा आक्रमकपणे वापर करण्यात येत आहे. तसेच संभाव्य उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याही फेसबुक पेजचा वापर करून घेतला जात आहे,’’ अशी माहिती पक्षाच्या सोशल मीडियाचे समन्वयक डॉ. अनीस खान यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Congress Warroom Ready Politics