‘इंजिना’त इंधन कोणाचे, धावणार कोणासाठी?

MNS
MNS

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण त्यानंतरही मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात असणारा प्रश्‍न कायम राहिला तो म्हणजे मनसेच्या इंजिनात यंदा इंधन कोणाचे असणार आणि इंजिन नेमके कोणासाठी धावणार? 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर थेट टीका केली. ठाकरे यांना मिळालेला प्रतिसाद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह वाढविणारा होता. मात्र, कोणाचेही उसने अवसान घेऊन काही ठोस करता येत नाही, याचा अनुभव काँग्रेस आघाडीला लोकसभा निकालानंतर आला. ठाकरे यांचा फारसा प्रभाव मतदारांवर पडला नाही. त्यामुळे केवळ काँग्रेस आघाडीतच नाही, तर प्रत्यक्ष मनसेच्या गोटातही कमालीची चिंता आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीला केलेल्या मदतीच्या बदल्यात पक्षाला काय मिळाले, असा सवाल आता कार्यकर्ते विचारू लागले आहेत. लोकसभेतील या चुका विधानसभेत तरी तातडीने सुधारा, पक्ष जिवंत ठेवा, अशीच त्यांची राज यांच्याकडे मागणी आहे. 

पुण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या भावना राज यांनी नुकत्याच जाणून घेतल्या. या संपूर्ण बैठकीत राज यांनी पक्षसंघटना, नागरिकांचे प्रश्‍न कशा पद्धतीने सोडविले पाहिजेत, यावर भर दिला; पण विधानसभेबाबत पक्षाची भूमिका काय असेल, याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊन काही जागा लढवायच्या की स्वतंत्र लढायचे?, याबाबत स्पष्टता आलेली नाही. 

खरंतर लोकसभेचे निकालच एवढे धक्कादायक लागले आहेत, की त्यातून विरोधी पक्ष अद्याप सावरू शकलेले नाहीत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीला विधानसभेत कशा प्रकारे सामोरे जायचे, हे अद्याप त्यांनाच उमगलेले नाही, अशी स्थिती आहे. काँग्रेस आघाडी सोबत गेल्याने त्याचे नेमके काय परिणाम होतील, याची चाचपणी मनसेत सुरू आहे. पुण्याचा विचार केला, तर शहरातील आठ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी चार जागा जातील, यात मनसे कुठे सामावला जाईल, असा प्रश्‍न आहे.

पुण्यात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. तरुणाईची फौज त्यांच्याकडे आहे. त्यांचा विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढावी, यासाठीच दबाव आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसेला शहरातील आठ मतदारसंघ मिळून १ लाख ६३ हजार मते मिळाली होती. या आठपैकी खडकवासला आणि कसबा मतदारसंघात तिसऱ्या, वडगावशेरी, कोथरूड, हडपसर आणि पुणे कॅन्टोंमेंट या मतदारसंघात चौथ्या, तर शिवाजीनगर आणि पर्वतीत पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत पक्षाची स्थिती आणखीन खालावलेली दिसते. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राज काय करणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. अशा वेळी विधानसभेबाबतची भूमिका लवकरात लवकर जाहीर करणे आवश्‍यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणासाठी लढायचे आहे, हे ठरवले तरच इंजिन लवकरात लवकर रुळावर येण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com