निवडणूक आली, कामे उरका सुसाट

PCMC
PCMC

पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची धास्ती असल्याने एरवी किरकोळ कारणांवरून तहकूब ठेवली जाणारी स्थायी समिती सभा गेल्या पाच दिवसांत सुसाट सुटली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या (ता. ४) नियमित सभेनंतर दोन विशेष सभा घेऊन कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या खर्चास मंजुरी दिली. शिवाय, बुधवारी (ता. ११) नियमित सभाही होणार आहे.

पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीच्या हाती असतात, असे म्हटले जाते. कारण, विविध विकासकामांना मंजुरी देण्याचे अधिकार समितीला असतात. अनेकदा ‘टक्केवारी’बाबत समितीच्या कामकाजावर टीकाही केली जाते. दर बुधवारी साधारणतः दुपारी दोन वाजता सुरू होणारी समितीची बैठक अनेकदा तास-दीड तास उशिराने सुरू होते. अनेकदा कारणांवरून तहकूब केली जाते. आठ दिवसांत मात्र सभेचे कामकाज सुरू आहे. पाच दिवसांत दोन विशेष सभा घेऊन कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. कारण, गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते.

त्यामुळे राज्यातील नेते किंवा मंत्र्यांची वाट न पाहता नियोजित कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्‌घाटन स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उरकून टाका, असा कानमंत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठ दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर रविवारी (ता. ८) चार प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि चार प्रकल्पांचे भूमिपूजन उरकण्यात आले.

दरम्यान, बुधवारच्या (ता. ४) नियमित स्थायी समिती सभेनंतर शनिवारी (ता. ७) व सोमवारी (ता. ९) विशेष सभा घेण्यात आली. बुधवारी (ता. ११) नियमित सभाही होणार आहे.

विकासकामांसाठी ३३ कोटी रुपये मंजूर
महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी (ता. ९) विशेष सभा घेतली. त्यात प्रभाग अकरामधील विकास आराखड्यातील ताब्यात आलेले रस्ते विकसित करण्यास व त्यासाठीच्या २२ कोटी दोन लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच, शहराच्या अन्य भागातील विविध विकासकामांसह ३३ कोटी १२ लाख रुपये खर्चासही मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. 

चिखलीतील जाधववाडी, कुदळवाडी परिसरात संप व पंप हाउसचे स्थापत्यविषयक कामांसाठी २६ लाख ६९ हजार आणि क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील खेळाडूंना एक वेळचे भोजन पुरविण्यासाठी ४६ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली. 

देहू-आळंदी रस्त्याला जोडणारे चिखलीतील नियोजित रस्ते विकसित केले जाणार आहेत. प्रभाग १९ मधील कामांसाठी दोन कोटी ४८ लाख ८० हजारांचा निधी मंजूर केला. भोसरीत पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला व पिंपरीतील संत तुकारामनगरमधील सावता माळी उद्यान परिसरात स्थापत्यविषयक कामे, मासूळकर कॉलनीत पावसाळी वाहिन्या टाकणे, नेहरूनगर दफनभूमीची सीमाभिंत, पिंपरी कॅम्प, लिंक रोड, भाटनगर परिसरात रस्त्यांची दुरुस्ती यासह प्रभाग पाच, धावडेवस्ती व यशवंतनगर भागात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शाहूनगर, तळवडे गावठाण, संत तुकारामनगर, आकुर्डी गावठाण, उद्योगनगर, सुदर्शननगर व वाकड परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण अशी कामे केली जाणार आहेत. त्यांच्या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com