Vidhansabha 2019 : राष्ट्रवादी, शिवसेनेचा आजपासून प्रचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली. रविवारी (ता. २२) राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे, तर सोमवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराला सुरवात होईल.

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली. रविवारी (ता. २२) राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे, तर सोमवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराला सुरवात होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार आहे. या वेळी आठही मतदारसंघांतील कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. मेळाव्याच्या नियोजनाची बैठक शनिवारी अजित पवार यांनी बारामती हॉस्टेल येथे घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या मेळाव्यात इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शनाची शक्‍यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागावाटपाच्या चर्चेत शिवाजीनगर, कसबा आणि कॅंटोन्मेंट हे मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे निश्‍चित झाले आहे; परंतु काँग्रेस पर्वतीसाठी आग्रही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने पर्वती मतदारसंघात प्रचारास सुरवात करण्याचे निश्‍चित केले, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळेल का, हा प्रश्‍न आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून शिवसेनेचा प्रचार सुरू होणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता लोहगाव येथे मेळावा होणार आहे, त्यासाठी उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, शहरप्रमुख संजय मोरे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (ता. २३) गणेश कला क्रीडा मंच येथे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या वेळी प्रचाराचा नारळ फुटणार आहे. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी जे. पी. नड्डा हे पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची बैठक घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 NCP Shivsena Promotions Politics