Vidhansabha 2019 : आमदारकीसाठी सगळीकडेच गर्दी

नितीन बारवकर
गुरुवार, 23 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन भाजप, दोन शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे. 
  • सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व. 
  • ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या विशेष मर्जीतला मतदारसंघ. 
  • लोकसभेतील यशापयशावरच युती आणि आघाडीचे भवितव्य. 
  • भोसरी, आंबेगाव, हडपसरमध्ये युतीतील जागा वाटपावरून संघर्षाची चिन्हे. 
  • निवडणुकीत जातीची समिकरणे यशस्वी ठरल्यास प्रस्थापितांवर गंडांतराची शक्‍यता.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने उभे केलेले आव्हान यशात बदलते की अपयशात याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. 

गेली साडेचार वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारे भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत एकत्र दिसले. मात्र, त्यातील काहींनी युतीतील बेबनावाच्या काळात विधानसभेसाठी स्वतंत्र तयारी केली होती. त्यावर पाणी फिरलंय. त्यातील अनेकांना ‘आमदार’ होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने युतीअंतर्गत संघर्षाची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीने तालुक्‍यातालुक्‍यातील सुभेदारांना मधाचे बोट लावत लोकसभेतील विजयासाठी कामाला लावले. त्यातील अनेकांनी विधानसभेसाठी दंड थोपटल्याने राष्ट्रवादीतही उमेदवारीवरून सुंदोपसुंदी होऊ शकते.  

शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील येथून दोनदा जिंकलेत. सलगची हार राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. त्यामुळे अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या उमेदवारीचा डाव राष्ट्रवादीने टाकला. कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासाठी जिगर लावली. लोकसभेच्या निकालावर विधानसभेतील यशापयशाचे बरेचसे ठोकताळे ठरू शकतात. या मतदारसंघातील आंबेगाव वगळता इतर विधानसभा मतदारसंघ सध्या युतीकडे आहेत. लोकसभा निवडणुकीत, राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचे आमदार, त्यांना पक्षांतर्गत स्पर्धक नसला; तरी दुसऱ्या फळीच्या आशा पल्लवीत झाल्यात. आढळराव याच तालुक्‍यातील, वळसेंविरोधामध्ये ते प्रबळ आघाडी उघडू शकतात किंवा लोकसभेत दगाफटका झाल्यास स्वतःदेखील रिंगणात उतरू शकतात.

आमदार बाबूराव पाचर्णे शिरूरमधून भाजपचे ‘वन मॅन शो’ आहेत. लोकसभेला त्यांनी आढळरावांसाठी तगडे नियोजन लावले; तर कोल्हेंच्या विजयासाठी माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी झटून काम केले. लोकसभेला खांद्याला खांदा लावलेल्या या नेत्यांची विधानसभेच्या उमेदवारीसाठी छातीला छाती भिडू शकते. भोसरीत आमदार महेश लांडगे भाजपचे सहयोगी आहेत. युतीतील बेबनावामुळे ते आढळरावांविरुद्ध आक्रमक होते. परंतु, युतीनंतर विरोध संपवून त्यांनी तडाखेबंद प्रचार केला. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभेच्या तोंडावर ‘मनसे’तून शिवसेनेत प्रवेश केल्याने, शिवसेनेकडून विधानसभेसाठी जय्यत तयारी केलेल्या आशा बुचके नाराज आहेत.

राष्ट्रवादीकडून अतुल बेनके यांच्या नावाची चर्चा असली; तरी लोकसभेत पराभूत झाल्यास कोल्हेंच्या नावाचाही इथून विचार होऊ शकतो. खेडमधून शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी जय्यत तयारी केली असून, मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ते सरसावलेत. हडपसरमधून योगेश टिळेकर या भाजप आमदारांनाही गतवेळच्या प्रतिस्पर्ध्यांशीच पुन्हा लढत द्यावी लागू शकते.

लोकसभेतील यशापयशावरच गणिते अवलंबून असल्याने आपल्या भागात किती मताधिक्‍य मिळते, याकडे इच्छुकांचे डोळे लागलेत. युतीपूर्वी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचे भवितव्य मात्र युतीच्या जागावाटपावरच अवलंबून आहे. 

पक्षनिहाय इच्छुक
राष्ट्रवादी - दिलीप वळसे पाटील, विलास लांडे, प्रदीप कंद, अशोक पवार, दिलीप मोहिते, गणपतराव फुलवडे, अतुल बेनके, संजय काळे, मंगलदास बांदल, चेतन तुपे, सुरेश घुले, प्रशांत जगताप.   

भाजप - बाबूराव पाचर्णे, महेश लांडगे, योगेश टिळेकर, जयसिंग एरंडे, शरद बुट्टे पाटील.   

शिवसेना - सुरेश गोरे, शरद सोनवणे, अविनाश रहाणे, जयश्री पलांडे, अक्षय आढळराव, सुलभा उबाळे, महादेव बाबर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Shirur Constituency MLA Yuti Aghadi Politics