#कारणराजकारण : उदाचीवाडीत फिल्टरशिवाय घोटभर पाणीही धोकादायक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुळा-मुठा नदीचे पाणी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे; पण हे सांडपाणीमिश्रित पाणी असते. जमिनीत पाझरूनही पाण्यात विरघळलेल्या विषारी रासायनिक घटकांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून फिल्टर बसवला आहे. 
- अभिमन्यू कुंभारकर, माजी सरपंच, उदाचीवाडी.

पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाचीवाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले. ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सरळ मुळा नदीत सोडल्याने या गावावर ही परिस्थिती आली आहे. पुणे महापालिकेने आपली जबाबदारी झटकल्याने फिल्टर हाच या गावाचा आधार झाला आहे.

शहराजवळील आंबेगाव, नऱ्हे, धायरी या भागांतील काही सोसायट्यांसाठी टॅंकर हाच पाण्याचा मुख्य स्रोत. या सोसायट्यांमधील बहुतांश घरात पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर दिसतो. येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यथा आपण ऐकल्या असतील. त्या जवळून पाहिल्या किंवा अनुभवल्याही असतील. पण, पुण्यापासून चाळीस-पन्नास किलोमीटरवर असलेले उदाची वाडी या अकराशे लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक घरात ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) फिल्टर बसवलाय. या गावातील एकही जण फिल्टरशिवाय घोटभर पाणी पिऊ शकत नाही. खरेतर ते धाडसच करत नाहीत. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता महापालिका थेट ते मुठा नदीत सोडते. मुळा-मुठा नद्यांचे हे पाणी पुढे याच भागात वाहत जाते. हेच या गावकऱ्यांचे पिण्याचे पाणी!

कोरेगाव मूळ येथील नायगावच्या ढोहातून पुरंदर पाणी उपशातून हे पाणी उदाची वाडीच्या तलावात सोडले जाते. तेथून हे पाणी पाझरून विहिरी आणि विंधनविहिरींमध्ये येते; पण त्यानंतरही पिण्याच्या पाण्यातील दूषित घटक कायम असतात. त्यामुळे पिण्यासाठी प्रत्येक गावात ‘आरओ’ची सुविधा असलेला फिल्टर बसविण्यात आले आहेत. विहीर आणि विंधनविहिरींतून उपसलेले पाणीही खराब असते. त्याचे दुष्परिणाम लहान मुलांवर लगेच जाणवतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी फिल्टरला प्राधान्य देण्यात येते, असे येथील ग्रामस्थ सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha2019 Purandar Vidhansabha Constituency Udachiwadi Water Issue