स्वमग्न तेजसची चित्रमय दुनिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

‘विहान’च्या प्रशिक्षकांना यश; हातवारे, चित्रातून व्यक्‍त करतोय भावना

‘विहान’च्या प्रशिक्षकांना यश; हातवारे, चित्रातून व्यक्‍त करतोय भावना

पुणे - बोलता न येणारा... भावना व्यक्त करू न शकणारा... तेजस (नाव बदललेले आहे) हा वीस वर्षांचा स्वमग्न (ॲटिस्टिक) मुलगा. स्वतःच्या विश्‍वात हरवून जाणाऱ्या तेजसमध्ये काही केल्या सुधारणा होत नव्हत्या, मग तो ‘विहान’ संस्थेत दाखल झाला. तेथे त्याची आवड, क्षमता जाणून घेऊन त्याच्या कलाने त्याला रमविण्यात पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांना यश आले आणि तेजस स्वत: हातवारे किंवा चित्र काढून आपल्या भावना व्यक्त करू लागला. स्वत:त मग्न असणारा हा मुलगा आता इतरांना भेट देण्यासाठी छोट्या-छोट्या वस्तूही बनवू लागला आहे. हे साध्य झाले ‘विहान’ या संस्थेतील प्रशिक्षणामुळेच.

स्वमग्न मुलांच्या पालकांनी एकत्रित येऊन २०११ साली बावधन येथे ‘विहान’ ही संस्था सुरू केली. छोटेखानी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होऊ लागले आहे. सूर्याच्या पहिल्या किरणाला ‘विहान’ म्हणतात. सूर्योदय हा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो, त्याच सकारात्मक दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झाली आहे. स्वमग्न मुलांमध्ये काही प्रमाणात सुधारणा व्हावी, याकरिता संस्थेच्या संस्थापक शैलजा शर्मा यांच्या पुढाकाराने एक ‘मॉडेल’ राबविण्यात येत आहे. 

शर्मा म्हणाल्या, ‘‘आपले मूल स्वमग्न आहे, हे पालकांनी प्रथम स्वीकारायला हवं. तरच पालक आणि प्रशिक्षक यांच्या मदतीने अशा मुलांमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्‍य आहे. क्षमता आणि आवड जाणून घेऊन अशा मुलांना प्रशिक्षण दिले जाते. एका स्वमग्न मुलासाठी एक प्रशिक्षक लागतो, असा गैरसमज आहे. पाच ते सहा मुलांसाठी एक प्रशिक्षक असला तरी त्या मुलांमध्ये सुधारणा घडू शकते. फक्त तो प्रशिक्षित हवा.’’ ‘‘कधी पालकांना मदतीला घेऊन, तर काही वेळा पालकांना प्रशिक्षण देऊन अशा मुलांना शिकविले जाते. सध्या संस्थेत नऊ मुले आहेत. ती छोटी-छोटी कामेही करून लागली आहेत. तोरण, कागदापासून पिशव्या बनविणे आणि चित्रातून भावना व्यक्त करणे, यात ती रमत आहेत. काही मुलं खूप रागीट होती, सतत वस्तू फोडायची; पण आता तीही इतर गोष्टींमध्ये रमली आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

स्वत:च्या विश्‍वात रमणाऱ्या या मुलांना पालकच स्वत: स्वीकारत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते. त्यामुळे सगळ्यात आधी पालकांनी आपले मूल स्वमग्न आहे, हे समजून घ्यायला हवे. समाजानेही त्या मुलांकडे उपेक्षित घटक म्हणून न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. त्यांना समाजाने स्वीकारायला हवे.
- शैलजा शर्मा, संस्थापक, विहान

काय करणे अपेक्षित...
या मुलांसाठी सरकारने सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात
मुलांचा कल जाणून घेऊन, त्याप्रमाणे प्रशिक्षण द्यावे
पालकांनी प्रशिक्षकाचे सहकार्य घ्यावे
मुलांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण द्यावे
अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी सुविधा हव्यात

‘स्वमग्न’जागृती दिनानिमित्त कार्यक्रम
‘विहान’ संस्थेतर्फे रविवारी (ता. २) स्वमग्न मूल आणि त्यांच्या भावा-बहिणींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात सामान्य मुलांसाठी प्रश्‍नमंजूषा असेल. तसेच स्वमग्न मूल आपल्या भावंडासमवेत विविध पोस्टर्स बनविणार आहे. पालकांसाठीही वेगळा कार्यक्रम असणार आहे.
स्थळ : ‘विहान’ संस्था, बी- १०१, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेसमोर, डीएसके जान्हवी सोसायटी, बावधन
वेळ : दुपारी ४ ते सायंकाळी ६

Web Title: vihan organisation