समाविष्ट गावांत तातडीने सुविधा द्या - विजय शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - महापालिकेत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. 

पुणे - महापालिकेत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. 

शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हद्दीजवळ असलेल्या 11 गावांचा सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत समावेश केला गेला. या गावांतील प्रश्‍नांसंदर्भात शिवतारे यांनी बैठक बोलावली होती. ग्रामपंचायतीचा कारभार महापालिकेकडे हस्तांतरित करण्यापलीकडे या गावांत फारशी प्रगती झाली नसल्याबाबत शिवतारे यांनी चिंता व्यक्त केली. समाविष्ट केलेल्या आंबेगाव आणि वडगाव आदी भागातील बेकायदा नळजोडांना मीटर बसवून पाणीपट्टी वसूल करा, सांडपाणी आणि मैलापाणी वाहिन्यांची व्यवस्था, कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यान्वित करा, ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. 

ग्रामपंचायतीकडील कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत, त्यांच्यापैकी काही कर्मचाऱ्यांचेच वेतन नियमितपणे होत आहे. काही कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन सुरू केलेले नाही याकडे शिवतारे यांनी लक्ष वेधले. यावर महापालिका प्रशासनाने संबधित ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांबाबत सुरवातीला मिळालेली आकडेवारी आणि त्यानंतर मिळालेल्या आकडेवारीत फरक आढळला आहे. सर्वच ग्रामपंचायतींनी ती आकडेवारी वाढवून सांगितल्याचा दावाही प्रशासनाने केला. प्रथम आलेली यादी गृहीत धरून संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येत आहे. वाढीव यादीबाबत शंका असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावर विजय शिवतारे यांनी यासाठी समिती नेमून खातरजमा करा आणि पुढील कार्यवाही तातडीने करा, असा आदेश पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

निमंत्रणातील चुकीमुळे मंत्री भडकले 
राज्यमंत्री शिवतारे यांनी समाविष्ट गावांतील समस्यांबाबत सोमवारी बैठक घेण्यात येत असल्याचे पत्र पुणे महापालिकेला पाठविण्यास सचिवांना सांगितले होते; परंतु सचिवांनी भविष्यात समाविष्ट होणाऱ्या उर्वरित 18 गावांमधील समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केल्याचे पत्र महापालिका व संबधित अधिकाऱ्यांना पाठविले. या पत्रानुसार अधिकारी सर्व तयारीनिशी बैठकीला उपस्थित राहिले. बैठक सुरू झाल्यानंतर शिवतारे यांनी समाविष्ट गावांबाबत चर्चा उपस्थित केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्‍नार्थक भाव उमटले. अधिकाऱ्यांनी पत्रातील उल्लेख केल्यानंतर शिवतारे यांनी सचिवांना खडसावले.

Web Title: vijay shivtare Provide facilities in the included villages immediately