राजकारणात अपघाताने आलो : विजय शिवतारे

राजकारणात अपघाताने आलो : विजय शिवतारे

सोमेश्वरनगर : मी फार वांड होतो. चौथीतच बिड्या प्यायचो. गुरामागं जायचो. पण वर्गात पूर्ण लक्ष असल्याने सर्व स्कॅालरशिप मिळवल्या. इंजिनिअर होण्याच्या स्वप्नापायी एसटीच्या टपावर बसून पुण्याला गेलो. मुंबईत चार-पाच वर्ष एका पँट-शर्टवर दिवस काढले. इंजिनिअरींगवरही न थांबता उद्योगपती बनलो. राजकारणातही अपघातानेच आलो आणि उपाशीपोटी शिवतारेगोठ्यात बाळाला जन्म देणाऱ्या आईचा मुलगा राज्यमंत्री झाला, अशा शब्दांत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विद्यार्थी मेळाव्यात शिवतारे यांनी समोरच्या तरूणाईशी मुक्त संवाद साधला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, विलास बोबडे, संजय घाडगे, भीमराव बनसोडे, गुलाबराव गायकवाड, सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे आदी उपस्थित होते.  

शिवतारे म्हणाले, ग्रामीण मुलांमध्ये परिस्थितीमुळे नैराश्य असते. ते झटकावे म्हणून माझा प्रवास सांगत असतो. उद्दीष्ट असेल आणि ते साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर यश मिळतेच. वेडं झाल्याशिवाय यश मिळत नाही. परिंचे गावाजवळील शिवतारेगोठ्यात माझा जन्म झाला. बारावीपर्यंत जनावरांसोबत वाढलो. परीक्षेसाठी सासवडला गेलो की सोपानदेव मंदिरात मुक्काम असायचा. आई खूप मारायची. एकदा पेपरमध्ये उंच इमारत आणि शेजारी उभा इंजिनिअर पाहून इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहिलं. यादववाडीतून एसटीच्या टपावर बसून पुण्याला गेलो. तिथून रेल्वेतून विनातिकीट मुंबईला पोचलो. खूप चौकस असल्याने एकदा अंधेरी ते माझगाव डॉक या रस्त्यावर दारू वाहणारी गाडीही चालवून पाहिली.

सुदैवाने पोलिसांनी केवळ गाडीच पकडली. इंजिनिअर झाल्यावर नोकरी केली. नंतर उद्योगपती बनलो. आईने समाजासाठी काहीतरी कर असे सांगितल्याने अपघातानेच राजकारणात आलो. राष्ट्रवादीतल्या गर्दीमुळे शिवसेनाप्रमुखांना भेटून शिवसेनेत गेलो. एका वर्षात आमदारकी लढवून विजयी झालो आणि पुढच्याच टर्ममध्ये राज्यमंत्री बनलो.

शाळेत असताना लिंबाच्या झाडावर बसून जे इंग्रजी बोलायचो त्याचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर फिरताना उपयोग झाला. तुम्हीही खचू नका. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. 
प्राचार्य डॅा. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अक्षय काळकुटे यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी आभार मानले.

आणखी साडेसहा हजार एकर एमआयडीसी होणार

पुरंदरमध्ये सात हजार एकराचे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. सध्याच्या एमआयडीसीमध्ये नऊ हजार लोक काम करतात आणखी साडेसहा हजार एकर क्षेत्रावर आणखी औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) येत आहे. गुंजवणीचे पाणीही येत आहे. यामुळे पुरंदर, बारामतीसह पुणे जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा शिवतारे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com