लांडे-मोहिते यांच्यात दिलजमाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

चाकण - लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या बरोबर असलेला दुरावा दूर करण्यासाठी त्यांनी मोहिते यांना चहापानासाठी एका हॉटेलात बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली आणि मग दोघांच्या गप्पाही रंगल्या. 

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि लांडे यांच्यात लढत झाली तर या वेळी लांडे निवडून येतील, असा विश्वास लांडे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आहे. खेडमध्ये मताधिक्‍य मिळविण्यासाठी मोहिते यांच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. लांडे यांचा खेड तालुक्‍यात नातलग तसेच समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे. लांडे हे राजकारणात असले तरी ते एक उद्योजक आहेत. त्यांची कंपनी चाकण येथे आहे. त्यामुळे त्यांचा संबंध तरुणवर्ग, कामगारांशी आहे.

खेड तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असले तरी दोन्ही गटांशी लांडे यांचे सख्य आहे. त्यामुळे दोन्ही गट निवडणुकीत काम करतील, असा लांडे यांना विश्वास आहे. या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल, असा राष्ट्रवादीला तसेच लांडे व त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. लांडे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात २००९ मध्ये निवडणूक लढविली होती. त्या वेळी लांडे यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव झाला होता. 

माजी आमदार विलास लांडे यांनी चाकणला एका हॉटेलवर चहापानास बोलावले, त्यामुळे मी गेलो आणि आमची चर्चा झाली.
- दिलीप मोहिते, माजी आमदार, खेड

Web Title: Vilas Lande Dilip Mohite Politics Loksabha Election