लांडे यांच्या बंडखोरीमुळे "राष्ट्रवादी'त खळबळ

मिलिंद वैद्य
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पिंपरी - माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने "राष्ट्रवादी'मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसेचे मिळून लांडे हे सर्वपक्षीय उमेदवार ठरण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी - माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने "राष्ट्रवादी'मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसेचे मिळून लांडे हे सर्वपक्षीय उमेदवार ठरण्याची शक्‍यता आहे. 

आमदार अनिल भोसले यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लांडे आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. ""भोसले यांना पुन्हा उमेदवारी देताना आपल्याला पक्षश्रेष्ठींनी विश्‍वासात घेतले नाही,'' असे दोघांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळेच नाराज झालेल्या लांडे यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हा निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज बुधवारी सकाळी दाखल केला. तत्पूर्वी लांडे यांनी पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ""कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी मागे घेणार नाही. येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल,'' असेही लांडे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लांडे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक असल्याने दुसरीकडे त्यांची कॉंग्रेसबरोबरही बोलणी सुरू आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसची 135 मते आहेत. "राष्ट्रवादी'ने नांदेड व आणखी एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने कॉंग्रेसही येथे लांडे यांना पाठिंबा देण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. 

लांडे भाजपपुरस्कृत? 
दरम्यान, दोन दिवसांत काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने अशोक येनपुरे यांना उमेदवारी दिली असली, तरी भोसले यांच्या तोडीस तोड म्हणून लांडे यांना भाजपने पुरस्कृत करायचे व येनपुरे यांना माघार घ्यायला लावायची, असा पर्याय भाजपपुढे असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांनंतर चित्र स्पष्ट होताना लांडे हे भाजपपुरस्कृत उमेदवार दिसतील, अशी शक्‍यता बळावली आहे. शहरात भोसरी मतदारसंघात लांडे यांची हक्काची वीस मते आहेत. भाजपचा पाठिंबा मिळाला, तर त्यांना आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांची 25 ते 30 मते मिळू शकतात. शिवाय आझम पानसरे यांचे 25 समर्थक लांडे यांना मदत करू शकतात. या सर्व मतांची गोळाबेरीज 75 च्या जवळपास जाते. जिल्ह्यात भाजपची 64 मते आहेत. शिवाय शिरूर, वडगाव मावळ व दौंडमधून लांडे यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो. पुण्यात भाजपचे 25 व मनसेचे 25 नगरसेवक आहेत. मनसे भाजपच्याच पारड्यात मते टाकतील, अशी अटकळ लावली जात आहे. या निवडणुकीत "क्रॉस वेटिंग'ची शक्‍यता अधिक असल्यामुळे लांडे "राष्ट्रवादी'च्या उमेदवारापुढे चांगले आव्हान उभे करू शकतात. 

दगाफटका टाळण्यासाठी "व्हिप' काढणार 
""विलास लांडे व आझम पानसरे नाराज होणे स्वाभाविक आहे. श्रेष्ठींनी अगोदर त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे मलाही वाटते. पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षात अनेक गट आहेत. गटबाजी टाळण्यासाठी पक्षाने भोसले यांना उमेदवारी दिली असावी. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गटबाजी परवडणारी नाही. या वेळी राष्ट्रवादी "मराठा कार्ड' खेळणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे मला किंवा पानसरे यांना उमेदवारी मिळणे शक्‍य नव्हते; पण असे असले तरी श्रेष्ठींनी आम्हाला विश्‍वासात घ्यायला हवे होते. लवकरच दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी चर्चा केली जाईल. या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी पक्षाच्या वतीने "व्हिप' जारी केला जाईल.'' 
- योगेश बहल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते 

Web Title: Vilas Lande rebel NCP excitement