गावांच्या विकासाचा ध्यास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक बनत आहेत. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये ग्राम सभा घेणे, गावांचा विकास आराखडा तयार करणे आणि त्याची गावकऱ्यांच्या सहभागातून अंमलबजावणी करणे, याला प्राधान्य देत या तरुण परिवर्तकांनी परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत राज्यातील जवळपास १३०० गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक काम करणार आहेत. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यातील काळवाडी, वडगाव कांदळी, ओरी बुद्रुक, पारगाव, शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजी या गावांमध्ये ग्राम परिवर्तकांच्या साहाय्याने विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येकाला पक्की घरे, आरोग्य सुविधा, वनसमृद्ध गाव, कौशल्याधिष्ठित गाव, स्वच्छता, शुद्ध पाणी, पूर्णवेळ वीज, उच्च दर्जाचे शिक्षण यासंदर्भातील कामांवर हे परिवर्तक अधिक भर देतील. शुभम सातकर (पुणे), पूनम सातपुते (इंदापूर) आणि गणेश शिंदे (लातूर) हे पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक म्हणून कार्यरत आहेत.

केवळ भौतिक विकासाकडे लक्ष केंद्रित न करता गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण, गटशेती, गावकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, गावातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे शुभम याने सांगितले. तो सध्या जुन्नर तालुक्‍यातील गावांमध्ये काम करत आहे.

उद्दिष्ट  
    गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणे
    राहणीमानात सुधारणा घडवून आणणे
    गाव स्वयंपूर्ण बनविणे 

 गाव हे विकासाचे मॉडेल बनावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. वाड्या-वस्त्यांमध्ये ग्रामसभा घेऊन स्थानिक समस्या जाणून घेत आहोत. त्यातून गावाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील तीन वर्षे गावामध्ये गावकऱ्यांच्या सहभागातून विकासकामे करण्यात येणार आहेत.
- शुभम सातकर, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक

Web Title: village development youth