इथे गावागावांमध्ये फक्‍त ज्येष्ठांचाच वावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

रोजगारासाठी, कामधंद्यासाठी गाव सोडणारे तरुण, हे दृश्‍य आता राज्यातील फक्त दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तर, पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या भोर तालुक्‍यामधील वाड्या-वस्त्यांचीच नाही, तर गावांचीही आता अशीच अवस्था झाली आहे. अशा गावागावांमध्ये राहतात फक्त स्थलांतरितांचे आई-वडील अन्‌ आजी-आजोबा!

पुणे - रोजगारासाठी, कामधंद्यासाठी गाव सोडणारे तरुण, हे दृश्‍य आता राज्यातील फक्त दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तर, पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या भोर तालुक्‍यामधील वाड्या-वस्त्यांचीच नाही, तर गावांचीही आता अशीच अवस्था झाली आहे. अशा गावागावांमध्ये राहतात फक्त स्थलांतरितांचे आई-वडील अन्‌ आजी-आजोबा!

राजस्थानमधील मारवाड भागात फिरताना गावेच्या गावे रिकामी असलेली तुम्ही पाहिली असतील. आपल्या राज्यातील मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमधील तरुणही रोजगारासाठी बाहेर पडल्याने गावांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक राहत असल्याचे चित्र प्रकर्षाने आपल्याला दिसते. पण, गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यामध्येही हेच चित्र दिसत असल्याचे निरीक्षण येथील नागरिकांनी नोंदविले आहे.

राजेश महांगरे म्हणाले, ‘‘भोरमध्ये गेल्या काही वर्षांपासून नव्याने उद्योग विकसित झाला नाही. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी भोरच्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या नाहीत. त्याचा फटका तरुणांना बसत आहे. ’’

गणपती, दिवाळी, गावची यात्रेच्या निमित्ताने मुले पुन्हा गावात येतात. त्या वेळी गावात उत्साह असतो. पण, ते परत शहराच्या दिशेने मार्गस्थ होताच गाव पुन्हा ओस पडतो. गावात राहतात ते फक्त या तरुणांचे वृद्ध आई-वडील आणि त्यांचे आजी-आजोबा, असेही त्यांनी स्पष्ट केले. भोर निसर्गाने समृद्ध असलेले गाव. गावात शेती आहे. येथील शेतकरी कष्ट करून जगतोय. पण, नोकरी करून स्थिरतेच्या अपेक्षेने गावातील युवा पिढी शिक्षणासाठी गावाबाहेर पडतीये, असेही सचिन गोरटे यांनी सांगितले. शिकलेल्या युवा पिढीला भोर गावात रोजगार नाही. मग सुविधा असलेल्या शहरांत स्थिर झालेल्या युवा पिढीची पावले गावाकडे वळतच नाहीत, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. सचिन देशमुख म्हणाले, ‘‘भोरच्या विकासासाठी ‘एमआयडीसी’सोबतच पर्यटन हाद महत्त्वाचा मुद्दा आहे. गड-किल्ले यांचे संवर्धन केल्यास भोरचा विकास नक्कीच शक्‍य आहे. पर्यटनामुळे येथील छोटे व्यावसायिक उभे राहत आहेत. पर्यटनासाठी योग्य उपाययोजना केल्यास रोजगार तर उपलब्ध होईलच; शिवाय आर्थिकदृष्ट्या भोर सक्षम होईल. हे मुद्दे आता भोरच्या रहिवाशांनाही महत्त्वाचे वाटत आहेत.’

स्थलांतराची कारणे
  उद्योगांचा अभाव
  रोजगाराच्या संधी नाहीत
  तरुणाई शेतीपेक्षा नोकरीच्या अपेक्षेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Old Peple Youth Migration Employment