विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - संभाजी ब्रिगेड

Sambhaji-Brigade
Sambhaji-Brigade

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.

अशा पद्धतीचे लेखन करणारे लेखक, प्रकाशक, वितरकांना त्वरित अटक करावी आणि तावडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभरातून आम्ही रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध करू, असा इशाराही ब्रिगेडने दिला आहे. 

ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, राज्य समन्वयक प्रभाकर कोंढाळकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन, सर्वशिक्षा अभियानांतर्गत छापलेली सर्व वादग्रस्त पुस्तके रद्द करून महापुरुषांची बदनामी थांबवावी, अशी मागणी केली. यासंबंधी नेमलेल्या चौकशी समितीचे अध्यक्षपद साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी स्वीकारू नये, असेही म्हटले आहे. 

शिंदे म्हणाले, ‘‘सर्वशिक्षा अभियानांतर्गत एकूण ४६४ पुस्तके आहेत. राज्यातील १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये त्यांच्या प्रती वितरित केल्या आहेत. त्यापैकी २७ पुस्तकांमध्ये महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर आहे. हे संघाचे षड्‌यंत्र असून, विद्यमान राज्य सरकार शिवद्रोही आहे. शुभा साठे, गोपीनाथ तळवळकर, प्र. ग. सहस्रबुद्धे, डॉ. प्रभाकर चौधरी या लेखकांवर राज्य सरकारने त्वरित गुन्हे दाखल करावेत. त्यांनी लिहिलेली ही पुस्तके अंधश्रद्धा, कर्मकांड, देवदेवतांचे उदात्तीकरण करणारी आहेत. परिणामी, शिक्षण विभागाने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत’’  

वादग्रस्त पुस्तकांच्या चौकशी समितीवर डॉ. सदानंद मोरे व पांडुरंग बलकवडे यांची निवड झाली आहे. डॉ. मोरे यांना अध्यक्षपद बहाल केल्याचे समजते. डॉ. मोरे यांनी अध्यक्षपद स्वीकारू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या उद्रेकाला त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशांत धुमाळ यांनी दिला. 
 विश्‍वस्तांवर गुन्हा दाखल करा

राज्य शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे दहा कोटी ७४८ रुपये सिंहगड इन्स्टिट्यूला दिले होते. मात्र, संस्थेने ४२२ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचे १ कोटी २९ लाख ८७ हजार ९५४ रुपये दिले. परंतु उर्वरित १ हजार ७७९ विद्यार्थ्यांना अद्याप रक्कम अदा केली नाही. याप्रकरणी संस्थेच्या विश्‍वस्तांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उद्या (ता. १६) चतुःशृंगी पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रभाकर कोंढाळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com