पुण्यात गुन्हेगारांकडून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन!

शहराच्या विविध भागात सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात असल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते.
criminals
criminals Sakal
Summary

शहराच्या विविध भागात सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात असल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते.

पुणे - पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून गुन्हेगारांच्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा (मोका), हद्दपार (तडीपार) व स्थानबद्धता (एमपीडीए), अशा विविध प्रकारच्या कारवाईद्वारे जरब बसविण्याचा प्रयत्न एकीकडे सुरु आहे. मात्र, दुसरीकडे तडीपार केलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांकडून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याची सद्यःस्थिती आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून त्यापैकी १० ते १५ टक्के गुन्हेगारांकडून पुन्हा गंभीर गुन्हे घडत आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहराच्या विविध भागात सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात असल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करीत संबंधित गुन्हेगार पुन्हा शहरात वास्तव्यास येत असल्याचे दिसून येत आहे. हे गुन्हेगार पोलिसांना आढळून आल्यास त्यांच्यावर कलम १४२ नुसार कारवाई केली जाते. मात्र, मागील अडीच वर्षांत तडीपार केलेले गुन्हेगार पुन्हा शहरात आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा धोका वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गुन्हेगार टाळतात मोबाईलचा वापर!

गुन्हेगाराला तडीपार केल्यानंतर पोलिसांकडून त्याच्या ‘मोबाईल लोकेशन’चा आधार घेऊन त्याचा शोध घेतला जातो. पोलिसांची ही क्‍लृप्ती गुन्हेगारांना चांगलीच पाठ झाली आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार मोबाईल बंद करून ठेवणे, मोबाईलचा वापर टाळणे, पोलिसांना चुकीचे मोबाईल क्रमांक देणे, असे प्रकार करत आहेत.

सराइतांचे पोलिसांशी साटेलोटे?

तडीपार केलेल्या गुन्हेगारांबाबत तो राहत असलेल्या भागातील संबंधित पोलिस ठाण्याच्या शोध पथकाला (डिबी) सर्व माहिती असते. इतकेच नव्हे तर गुन्हेगार तडीपार आदेशाचे उल्लंघन करत आल्याची माहितीही पोलिसांना मिळते. मात्र, गुन्हेगारांशी साटेलोटे असल्याने स्थानिक पोलिस ठाणे, डिबी पथक किंवा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

‘मोका’मुळे टोळ्या नरमल्या

पोलिस आयुक्त गुप्ता यांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे बहुतांश टोळ्या (कंपन्या) सध्या कारागृहात किंवा भूमिगत झाल्या आहेत. असे असले तरीही सराईत गुन्हेगारांनी मात्र पुन्हा डोके वर काढले असून, त्यांचा उपद्रव वाढत असल्याचे वास्तव आहे.

आदेशाचे उल्लंघन करण्याची कारणे...

  • पोलिसांचा वचक कमी असणे

  • कुटुंबाची ओढ आणि आर्थिक परिस्थिती खालावणे

  • गुन्हेगारांचे आपल्या परिसरात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न

  • खंडणी उकळणे आणि पूर्ववैमनस्यातून बदला घेणे

गुन्हेगार तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा शहरात दिसून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कलम १४२ नुसार कारवाई केली जाते. त्यांच्यावर कोम्बिंग ऑपरेशन आणि दैनंदिन तपासणी यातून लक्ष ठेवले जाते.

- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com