व्हायोलिनच्या सुरांत रमलेला रुचिर (व्हिडिओ)

Violin
Violin

पुणे - गेल्या आठ वर्षांपासून व्हायोलिन वादनात रमणाऱ्या रुचिर इंगळेला उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे व्हायोलिन वादनाच्या रियाझासाठी पर्वणीच वाटते. अलीकडेच तो पियानो आणि गाणंही शिकू लागला आहे. यासाठी त्याला सुट्टीचा पुरेपूर वापर करावासा वाटतो आहे.

आठवीत शिकत असलेल्या रुचिरला ज्युनिअर केजीत असल्यापासून व्हायाोलिनची गोडी लागली. प्रसिध्द व्हायोलिनवादक सचिन इंगळे हे त्याचे बाबा. ते सांगतात की, साडेतीन - चार वर्षांचा असतानाच रुचिरने व्हायोलिन शिकण्यासाठी हट्ट धरला. बाबा व्हायोलिनवर हिंदुस्तानी संगीत वाजवतात. त्यांनी रुचिरला पाश्चात्य पद्धतीनं शिकण्याविषयी समजून सांगितलं.

'सुझुकी' ही खास मुलांसाठी व्हायोलिनवादनाची विशेष शिक्षणपद्धती आहे.
रमा चोभे यांच्याकडून धडे घेणाऱ्या रुचिरनं गेल्या आठ वर्षांत मोठीच प्रगती केली. तीन वर्षांपूर्वी त्याला लंडनच्या जगप्रसिद्ध रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये जगभरातील निवडक व्हायोलिनवादक बालकलाकारांबरोबर सादरीकरणाची मोठी संधी मिळाली. 

रुचिर म्हणाला, " मी तासंतास व्हायोलिनच्या सुरांमध्ये रमतो.  रियाझ करताना शाळेतला अभ्यासही मनापासून करायचा असतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र  मला व्हायोलिनसाठी वाट्टेल तेवढा वेळ देता येतो. जगभरच्या मोठ्या कलाकारांचं रेकॉर्डिंग ऐकता येतं. त्यात काय काय वेगळं आहे, याबद्दल व्हायोलिन वाजवणाऱ्या माझ्या मित्रांशी गप्पा होतात. "

व्हायोलिनवादनासाठी आतापर्यंत भरपूर बक्षिसं मिळवलेल्या रुचिरच्या शिरपेचात नुकताच आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वीस एप्रिल रोजी लखनौमध्ये 'इंडिया नॅशनल यूथ ऑर्केस्ट्रा'तर्फे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोळा देशांतील व भारतातील चौदा राज्यांमधील वादकांनी केलेल्या सादरीकरणात रुचिरनं दीडशेपैकी १४८ गुण 
पटकावले. लंडनच्या ABRSM तर्फे घेतल्या गेलेल्या ग्रेड फाइव्ह परीक्षेत  पश्चिम भारत विभागात तो पहिला आला. 

रुचिरनं व्हायोलिनवादनात नाव कमवायचा ध्यास घेतला आहे. अलिकडेच तो पियानोही शिकू लागला आहे, कारण  व्हायोलिनवादनाच्या पाश्चात्य पद्धतीत पियानोची साथ असते. त्याबाबत नीट समजून घेता यावं म्हणून तो रीतसर त्याचेही धडे गिरवतो आहे. भारतीय अभिजात संगीताशी नातं जोडता यावं, यासाठी गाण्याचं शिक्षण घेतो आहे. उन्हाळ्याची सुट्टी रुचिरसारख्या कलावंतांना त्यांची कला उंचीवर नेण्यासाठी पर्वणी वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com