वीरगळी, वीरस्तंभ दुर्लक्षित

इंगळूण - गावाच्या मंदिराच्या परिसरातील वीरगळी.
इंगळूण - गावाच्या मंदिराच्या परिसरातील वीरगळी.

टाकवे बुद्रुक - वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या वीरगळी अथवा वीरस्तंभ आंदर मावळात त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. दगड अथवा लाकडी स्तंभाच्या या वीरगळी दुर्लक्षित आहे. मानवी चेहरा, कमळ, घोडा, चंद्र, तलवार या स्तंभावर कोरलेले आहे. या प्रत्येक कलेला प्रतीकात्मक असा अर्थ आहे; परंतु या सर्व वीरगळी दुर्लक्षित आहेत. त्यांचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे, अशी भावना वाढू लागली आहे. 

इंगळूण, कांब्रे, वाहनगाव, पिंपरी, कुसवली, माळेगाव अशा अनेक गावांत जुन्या गावठाण्यात या विरगळी दिसून येत आहेत. जुन्या देवळांच्या बाहेर अशा वीरगळ आहेत. ही परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठेमोठे वीरगळ आढळून येतात. त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा, असे जाणकारांचे मत आहे. साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात.

वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई, मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखविलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करीत आहे, असे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते, असे यातून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित आहे. आकाशात सूर्य चंद्र तळपत आहेत, तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली असे यातून सूचित करायचे असावे. बलिदान केलेल्या वीरांची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल. तर तिचे ते स्मारक मानले जाते.

स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली आहेत. आयताकृती वीरगळ फक्त समोरून किंवा तीन बाजूने कोरलेली तर स्तंभ वीरगळ चारही बाजूने कोरलेली आहे. वीरबळी, गोवर्धन गोधन, पशू, द्वंद्व, डोली गाववली परचक्र युद्ध, अश्‍वदल व गजदल, चौर्य, साधू व संत, सूर, ताबूत असे वीरगळीचे अनेक प्रकार पाहता येईल. युद्ध, दरबार, प्राणी, शिवलिंग, हार घेतलेले लोक, अंत्यसंस्कार, माणसांवर बैल उभे, ढाल तलवारी घेऊन युद्धे, विठ्ठल रखुमाई, कलश, वाघांशी युद्ध, नदी, झोपलेली माणसे, नंदीच्या पाठीवर पिंड अशी विविध चित्रे या शिळांवर कोरलेली दिसून येतात. या दुर्लक्षित वीरगळींचे संवर्धन करावे, असे आवाहन गडकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष आलम देशमुख व मावळ मराठा युवा संघाचे अध्यक्ष बबन आलम यांनी केले आहे.

आंदर मावळातील सर्व वीरगळींचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुरातत्त्व विभागाच्या वतीने आवश्‍यक ती परवानगी घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने या वीरगळींचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे यासाठी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेणार आहे.
- सुभाष आलम-देशमुख, अध्यक्ष, गडकल्याण प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com